‘बालगंधर्व’ हा प्रेक्षकांच्याच दृष्टीने नव्हे तर कलाकारांच्याही दृष्टीने तितकाच महत्त्वाचा विषय मानला जातो. त्यात मराठी मनात बालगंधर्वाविषयी कायमच एक हळवा कोपरा जाणवतो. एखादा देवलोकीचा गंधर्व खाली यावा आणि देवाने दिलेल्या आशीर्वाद व शापानुसार त्याने इथे आयुष्य कं ठावे असे बालगंधर्व जगले. आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांची ना त्यांनी कधी दखल घेतली, ना त्याविषयी तक्रार केली. गंधर्वानी मराठी रंगभूमीला काही स्वप्ने दाखवली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वत: झटले. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेणारे संगीत नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या गंधर्वयुगात प्रेक्षकांना प्रवेश करता येणार आहे. ‘अभिजात’ या नाटय़ संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून अनंत शंकर ओगले यांनी नाटकाचे लेखन केले आहे. एकूण ३० कलाकारांच्या संचात रंगणारे ‘संगीत बालगंधर्व’ हे नाटक कलाकारांसाठीच नव्हे तर पडद्यामागील कलाकारांसाठीही हे आव्हान आहे. परंतु या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना गंधर्वाचे वैभव पाहता येईल. आणि ही कलाकृती पाहणे रसिकांसाठीही एक भव्य अनुभव असेल, असे नाटय़निर्माते आकाश भडसावळे यांनी सांगितले.

नाटकाचे दिग्दर्शन सुनील जोशी यांनी केले असून संध्या म्हात्रे, उर्वी सुकी, कविता नाईक, आकाश भडसावळे, संजीव धुरी, मकरंद पाध्ये, अनिरुद्ध पेंडसे, मंदार खटावकर, चिन्मय जोगळेकर आदी कलाकारांचा यात समावेश आहे. परंतु बालगंधर्व, केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे, गोहरजान यांच्या प्रमुख भूमिका कोण साकारणार याबद्दल मात्र गुप्तता ठेवण्यात आली आहे. गंधर्वाच्या मूळ नाटकातील एकूण २८ पदांचा समावेश यात असून तबल्यावर आदित्य पानवळकर, वैभव जोशी तर ऑर्गन साथीला ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे व आदिनाथ पातकर हे साथसंगत करणार आहेत.