अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. सध्या बॉलिवूडमध्ये #MeToo ची जोरदार चर्चा रंगली असून यात अनेक नावाजलेल्या सेलिब्रेटींची नावं समोर आली आहेत. या वादामध्येच गायक-संगीतकार बप्पी लहरी यांनी त्यांच मत मांडलं आहे. बप्पीदांचा सध्या बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. मात्र  #MeToo वर भाष्य करुन ते चर्चेत आले आहेत.

‘ज्यावेळी महिलांवर अन्याय होतो. त्याचवेळी त्यांनी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.  घटना घडल्यानंतर तक्रार दाखल केली असती तर त्याचवेळी त्यांना न्याय मिळाला असता. विशेष म्हणजे अन्याय करणाऱ्याला शिक्षाही मिळाली असती. त्यासाठी आता अनेक वर्ष लोटल्यानंतर हा संघर्ष करावा लागला नसता. अन्याय झाल्यावर कधीही त्याच वेळी त्याला वाचा फोडा’, असं बप्पी लहरी म्हणाले. ‘मौसम इकरार के दो पल प्यार के’ च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले, ‘भारतात महिलांचा आदर करण्यात येतो. आई, बहीण,मुलगी किंवा पत्नी कोणीही असो महिलांचा आदर हा केलाच जातो. मी वर्षातले सहा महिने तरी परदेशात असतो. मात्र आपल्या देशासारखी संस्कृती कुठेच पाहायला मिळत नाही. विशेष म्हणजे #MeToo ही मोहीम परदेशातही सुरु आहे. परंतु त्याच्या तुलनेत आपले येथे पाहायला गेलं तर देशातील महिला अनेक वर्षांपूर्वीच्या प्रकरणांवर आता भाष्य करत आहेत’.