बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे. चाहते सुशांतच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांतच्या आठवणीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
भूमिकाने तिच्या इन्स्टाग्रावर सुशांतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘जवळपास २० दिवस होऊन गेले आहेत आणि आजही तुझ्या आठवणीने मला जाग येते. तू इतके टोकाचे पाऊल का उचललेस हा मी विचार करते. एकाच चित्रपटात मी तुझ्यासोबत काम केले आहे. पण त्या चित्रपटामुळे तुझ्यासोबत जोडले गेले. तू नैराश्यामध्ये होतास? काही पर्सनल गोष्ट होती? तू एकदा दुसऱ्यांशी बोलायला हवे होतेस’ असे भूमिकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
भूमिकाने या पोस्टमध्ये सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तिने तिच्या करिअरमधील संघर्षाबद्दलही वक्तव्य केले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. सुशांतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’, ‘ड्राइव्ह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.