सहज एकदा जाता जाता.. म्हणून न्यायालयाची पायरी चढलेला एक पंचविशीचा तरुण. ‘न्यायव्यवस्था’ अशी एक मोठी यंत्रणा आहे ज्यात सर्वसामान्यांच्या किरकोळ भांडणांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दहशतवादाच्या प्रकरणांवर वादविवाद करून न्याय दिला जातो. एरवी चित्रपटांमधूनच आपण rv02पाहिलेले चित्र म्हणजे समोर बसलेले ‘जजसाहब’, त्यांच्या एका बाजूला आरोपी, दुसऱ्या बाजूला साक्षीदार, सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील असा सगळा माहौल प्रत्यक्षात त्यानेही त्या दिवशी पाहिला. मात्र तिथे जे नाटय़ घडले ते त्या तरुणाने हुशारीने टिपले. त्याच्या मनात एक  विचार आला, त्याने तो पूर्ण अभ्यासाने वाढवला, रुजवला आणि अर्थातच खूप खटपटींनंतर सिनेमा नावाच्या माध्यमातून त्याने हे ‘कोर्ट’ प्रेक्षकांसमोर उभे केले. ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळ मिळवणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाची, त्याचा तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे ज्याने २८ व्या वर्षी आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे त्याची आणि या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या निर्माता, कलाकार आणि तंत्रज्ञांची आपली एक वेगळी कहाणी आहे. पडद्यावरच्या या ‘कोर्ट’रूम ड्रामामागची कहाणी खुद्द चैतन्य ताम्हाणे, चित्रपटाचे निर्माते व अभिनेते विवेक गोम्बर, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि शाहिरांची भूमिका साकारणारे अभिनेते वीरा साथादीर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन ऐकवली. जगभरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १७ पुरस्कार मिळवून एक नवा विक्रम करणारा हा चित्रपट १७ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी देशभरात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

एकत्रित प्रयत्नांची परिणती
हिंदूी नाटकातून मी काम केले आहे. सुनील शर्मा यांचे एक नाटक करत असताना चित्रपटासाठी पात्रांची निवड करणाऱ्या सचिन पुराणिक यांनी ‘कोर्ट’च्या ऑडिशन सुरू आहेत तू जाऊन ये असे सांगितले. त्यावेळी rv04पहिल्यांदाच निर्माते विवेक गोम्बर, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना भेटले. मुळात त्यांनी ऑडिशनला आलेल्या कोणालाही पटकथा दिली नव्हती. मला मात्र ती मिळाली होती. पटकथा वाचल्यानंतरच हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल, असे त्या वेळी वाटले होते. ते ज्या पद्धतीने काम करत होते ती पद्धतही फार वेगळी होती. त्यामुळे मला या चित्रपटाचा भाग व्हायचे होते. योगायोगाने चित्रपटासाठी ओळखीचे चेहरे चैतन्यला नको होते आणि मी रंगभूमीवर निवडक काम केलेले असल्याने तसा माझा चेहरा फार परिचयाचा नव्हता. त्यामुळेच माझी निवड झाली असावी, असे अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी सांगितले. गीतांजलीने चित्रपटात सरकारी वकिलाची भूमिका केली आहे. ‘चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने प्रचंड मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी तीन ते चार महिने आम्ही कार्यशाळा केली. त्यामुळे चित्रपट तयार व्हायला खूप वेळ लागणार हे माहिती होते. हा तद्दन व्यावसायिक चित्रपट नाही. सामाजिक विषय  विनोदी धाटणीने हाताळतानाच त्यातील सामाजिक आशय कुठे हरविणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळे तंत्रज्ञ आणि कलाकार हे नवखे होते. पण ते फार कुशल होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाच्या तालमीपासून ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ या प्रक्रियेचा भाग होते, आत्ताही आहेत. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून उमटलेली कलाकृती आहे’, असे गीतांजलीने सांगितले.
काम करताना मजा आली
‘कोर्ट’ या चित्रपटात ज्या लोकशाहिरांचा लढा लढवला गेला आहे त्यांची भूमिका नागपूरच्या वीरा साथीदार यांनी केली आहे. नागपुरात एका मासिकाचे काम पाहणाऱ्या वीरा यांचा चित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचा संबंध योगायोगाने सामाजिक कार्य करणाऱ्या वकिलांशी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या ‘कोर्ट’च्या टीमशी आला. ‘माझा चित्रपट क्षेत्राशी याअगोदर कधीही संबंध आलेला नव्हता. आमच्याकडील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्हे म्हटले तर सगळ्याच बाबतीत मागे. त्यामुळे चित्रपट करणे हे फक्त rv05मुंबई-पुण्याच्या लोकांचेच काम असे वाटत होते. मी एक मासिक चालवतो तसेच सामाजिक चळवळीत गेल्या काही वर्षांपासून काम करतो आहे. या चित्रपटात मी ‘लोकशाहीर’ ही भूमिका साकारली आहे. चित्रपटासाठी काम करशील का? अशी मला विचारणा झाली तेव्हा माझे सहकारी, मित्र यांनी अगोदर नाही म्हटले. त्यांचा विरोध पत्करून मलाही काम करायचे नव्हते. पण आलेली संधी का सोडायची, असाही पुन्हा एक विचार आला. मग सहकाऱ्यांनीही काम कर म्हणून सांगितले आणि मी चित्रपट स्वीकारला’, असे वीरा साथीदार यांनी सांगितले.  
शाहिराची भूमिका माझ्यासाठी ओळखीची होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, विलास घोंगळे यांची शाहिरी मी ऐकली होती. त्यांचा प्रभाव माझ्यावर होता. शिवाय, स्वत: सामाजिक चळवळींचा अभ्यासक असल्याने या गोष्टी माझ्यात भिनलेल्या होत्या. चित्रपटातील माझी भूमिका पाहून दिग्दर्शकांनी त्यासाठी माझी केलेली निवड योग्य आहे, असे प्रेक्षकांनाही नक्कीच वाटेल,असे ते विश्वासाने सांगतात. पहिल्यांदाच चित्रपट करताना खूप मजा आली, असे त्यांचे म्हणणे. म्हणजे चित्रपटक्षेत्राशी संबंधित माणसांची एक विकृत प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. ते पैसे बुडवतात, कलाकारांचा वापर करून घेतात अशा एक ना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. मात्र, ‘कोर्ट’ करतानाचा अनुभव फार वेगळा होता. हा चित्रपट करताना खूप शिकायलाही मिळाले. कलावंतांबद्दल आदर असला पाहिजे, याचे भान असणाऱ्या मंडळींनी हा चित्रपट केला आहे, असे वीरा यांनी सांगितले.
जीवनानुभवाची ‘पायरी’
मी मूळचा मुंबईचाच. मिठीबाई महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा आणि अन्य उपक्रमांत नेहमीच सहभागी व्हायचो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक माहितीपट, लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. ‘कोर्ट’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. एकदा मुंबईतील ‘अनाडी कोर्ट’मध्ये जाण्याचा प्रसंग आला. तेथे येणारे किंवा पकडून आणले जाणारे लोक, पोलीस आणि वकील यांच्यातील संभाषण, या rv06न्यायालयात दाखल होणारे खटले हे सगळे पाहिले. मला ते खूप गमतीशीर वाटलेच, पण एकूणच ‘कोर्ट’ व्यवस्थेवर विनोदी आणि थोडय़ाशा गंभीरपणे काहीतरी करावे, असे वाटले आणि त्यातून या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. वर्ष-दीड वर्ष या विषयावर, चित्रपटाच्या संहितेवर अभ्यास केल्यानंतरच कामाला लागलो, चैतन्यने सांगितले.
या चित्रपटात तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत सगळेच नवीन किंबहुना चित्रपट क्षेत्राशी कधीही संबंध न आलेले लोक आहेत. यामागचे कारणही चैतन्यने स्पष्ट केले. मुळात चित्रपटनिर्मितीचे असे कोणतेही शिक्षण मी घेतले नव्हते. मला जी कथा सुचली होती ती लोकांसमोर आणण्याचे माध्यम म्हणून मी सिनेमाची निवड केली होती. कारण या माध्यमातून तो कथाविचार सर्वदूर पोहोचेल ही खात्री होती. पण म्हणून चित्रपट करताना माझ्यापेक्षा या विषयातल्या जाणकाराला नियुक्त करून त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणे मला अजिबात जमणारे नव्हते. त्यामुळे स्वत:च शिकत चित्रपट करायचा होता आणि त्याच कारणासाठी चित्रपटात कलाकार म्हणून लोकांना परिचित असलेला चेहराही मला नको होता. मी ते मुद्दामच केले. अनुभवी कलाकार आणि मंडळींपासून मी लांबच राहिलो. ‘कोर्ट’ चित्रपटाच्या चमूला प्रत्यक्ष चित्रपटाशी संबंधित अनुभव नसेल, पण आम्हा सगळ्यांकडे जीवनानुभव होता आणि त्याच्याच जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलले आहे, असे तो सांगतो. इतरांप्रमाणेच चैतन्यलाही लहानपणापासूनच चित्रपटाचे खूप आकर्षण आहे. पण हातात पैसे नसतील तर आणि आर्थिक गणित जमले नाही तर मनात असूनही काही करता येत नाही. विवेक गोम्बर यांच्यासारखा निर्माता आम्हाला मिळाला आणि हा चित्रपट तयार झाला, असे सांगणाऱ्या चैतन्यने पुढच्या चित्रपटासाठी पैसे नसतील तर करणार नाही, हेही तितक्याच ठामपणे सांगितले. चित्रपट या माध्यमाला भरपूर पैसे लागतात. अपुऱ्या पैशात दर्जाशी तडजोड करून चित्रपट बनवण्यात अर्थ नाही.  चित्रपट करणे शक्य झाले नसते तर ब्लॉग किंवा कादंबरी अशा माध्यमातून मी मनातील विचार लोकांपुढे मांडले असते. आपण कुठेतरी आणि कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणे महत्त्वाचे असते, असे तो म्हणतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कार मिळाल्याने लोकांमध्येही ‘कोर्ट’बाबतची उत्सुकता वाढलेली आहे. प्रसारमाध्यमांतून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स दिली असून हा चित्रपट महाराष्ट्रासह नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आदी ठिकाणीही प्रदर्शित करत आहोत. देशभरातील समीक्षकांनीही ‘कोर्ट’चे कौतुक केले आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीतून असला तरी तो केवळ मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहील, अशी भीती आपल्याला वाटत नसल्याचे चैतन्यने सांगितले.
अभ्यास करूनच  निर्मिती
‘कोर्ट’ चित्रपटासाठी निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे विवेक गोम्बर हे खरे तर या चित्रपट संकल्पनेच्या पातळीवर असल्यापासून चैतन्यबरोबर आहेत. ‘तीन वर्षांपूर्वी चैतन्य आणि माझी भेट झाली. चैतन्यने दिग्दर्शित केलेल्या नाटकात मी काम केले आणि तेव्हापासून मी त्याला ओळखायला लागलो होतो. त्यावेळी चैतन्य आयुष्याच्या एका वळणावर उभा होता. त्याच्या मनात ‘कोर्ट’चा विचार सुरू होता. मात्र त्यावर चित्रपट करण्याएवढी आर्थिक क्षमता नव्हती. गप्पागप्पांमधून हा विषय मला समजला. चैतन्यचे rv03विचार, त्याचा दृष्टिकोन याबद्दल तोवर मला कुठलीही शंका उरली नव्हती. मला विषयही आवडला होता. पण काही एक निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी मी महिनाभर वेळ घेतला. त्या महिन्याभरात मी राजस्थानला घरी गेलो. माझी आर्थिक क्षमता, माझ्याकडे असलेले पैसे, मला स्वत:ला यातून काय साधायचे आहे या सगळयाचा मी खोलवर विचार केला. त्या महिन्याभरात मी चैतन्यशी एकदाही संपर्क केला नव्हता. मात्र मुंबईत परतलो तेव्हा माझा ठाम निर्णय झाला होता’, असे विवेक गोम्बर यांनी सांगितले. तुमची कथा कितीही चांगली असली तरी आर्थिक पाठबळ नसेल तर पटकथा विकसित करणे हे दिग्दर्शकासाठी सोपे नसते. म्हणूनच या चित्रपटासाठी चैतन्यला कुठेही आर्थिक गोष्टींचे दडपण येणार नाही याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘या चित्रपटाबाबत आमच्या दोघांच्या अनेक बैठका झाल्या. त्यातून ‘कोर्ट’ करायचे हे नक्की झाले. चैतन्यला चित्रपटाची कथा लिहायला सांगितली. चित्रपटाचे बजेट साडेतीन कोटी रुपयांचे आहे. आम्हा सगळ्यांची तीन वर्षांची मेहनत आणि अभ्यासातून ‘कोर्ट’ तयार झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मराठी आणि अन्य प्रसारमाध्यमांनीही आमची दखल घेतली आहे. आता चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा देशभरातील प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्सुकता आहे. शेवटी, चित्रपट कितीही चांगला असला तरी त्याचे यश हे तिकीटबारीवर मिळणाऱ्या कमाईतूनही सिद्ध झाले, व्हायला हवे असे आग्रही मत विवेक गोम्बर यांनी व्यक्त केले.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

rv07‘कोर्ट’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी, अभिनेता वीरा साथीदार, चित्रपटाचा निर्माता व प्रमुख कलावंत विवेक गोम्बर आणि दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे (छाया : गणेश शिर्सेकर)

‘कोर्ट’ चित्रपटाच्या टीमसोबतच्या गप्पांचे सर्व व्हिडिओ ‘लोकसत्ता’च्या  ww.youtube.com/LoksattaLive  या चॅनेलवर पहायला मिळतील.