‘जग्गा जासूस’ सिनेमाची अभिनेत्री कतरिना कैफसोबत काम करण्याचा अनुभव सुखद असल्याचे प्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक शामक दावरने सांगितले. शामकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन कतरिनाचे गोडवे गाणारे ट्विट केले आहे. ”जग्गा जासूस’ सिनेमात कतरिनासोबत काम करुन फार छान वाटले,’ अशा आशयाचे ट्विट त्याने केलंय.

५५ वर्षीय या नृत्य दिग्दर्शकाने कतरिनासोबतचा एक फोटोही ट्विटरवर शेअर केला. अनुराग बासूने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात कतरिना आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका आहे.

https://twitter.com/Shiamakofficial/status/848842995927441408

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जग्गा जासूस सिनेमाच्या चित्रीकरणावेळी कतरिना गंभीर जखमी झाली होती. कतरिनाला मान आणि पाठीमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे सिनेमाचे चित्रीकरणही काही काळासाठी थांबवले होते. डॉक्टरांनी तिला फार हालचाल करण्यास मनाई केली होती. तसंच तिला काही दिवसांसाठी पूर्णपणे आराम करण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या दुखापतीमुळे तिला झी पुरस्कार सोहळ्यालाही मुकावे लागले होते. या सोहळ्यात ती परफॉर्म करणार होती.

‘जग्गा जासूस’ हा सिनेमा सुरूवातीला ७ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण, सततच्या अडचणींमुळे या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही. सुरुवातीला कतरिना आणि रणबीर हे दोघं एकत्रितपणे ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं प्रमोशन करणार नसल्याचं बोललं जात होतं. पण, आता त्यांच्यातला वाद थोडा मावळला असून, दोघांनीही एकत्र प्रमोशन करण्याची तयारी दर्शवली आहे.