शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तर सध्या त्याच्या धडक सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ईशान आणि जान्हवी कपूरच्या यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान ईशानच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. माजिद मजिदी दिग्दर्शित सिनेमात ईशानचा अभिनय पाहून त्याच्याकडे एक चांगला अभिनेत्याचे गुण असल्याचे अनेकांना वाटते.
सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या सिनेमात ईशानने धोबी घाटमधील एका मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरवरून सिनेमाची कथा मुंबई शहरात फिरणारी आहे हे स्पष्ट दिसते. सिनेमात त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. येत्या २३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
तरण आदर्शने ट्विट करत म्हटले की, ‘माजिज मजिदीच्या सिनेमात ईशान आणि मालविका यांच्या मुख्य भूमिका आहे. ए.आर. रेहमानचं संगीत आहे. मला हा ट्रेलर फार आवडला.’ २३ मार्चला हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ईशानला या सिनेमासाठी टर्की येथील बोस्फोरुस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ईशान सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 2:03 pm