अभिनेत्री भाग्यश्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९८९ साली ‘मेने प्यार किया’ चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. खरंतर भाग्यश्रीचा पहिलाच चित्रपट सुपरडूपर हिट ठरला होता. त्यामुळे करीअरमध्ये भाग्यश्रीकडे मोठी झेप घेण्याची संधी होती.
पण त्यानंतर भाग्यश्री अचानक चित्रपट सृष्टीपासून दूर गेली. तिने तिच्या संसारावर लक्ष केंद्रीत केले. करीअरमधल्या या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल भाग्यश्रीने आता भाष्य केले आहे.
” ‘मेने प्यार किया’ मध्ये काम करत असताना मला अभिनयाबद्दलची माझी आवड लक्षात आली. मला मिळालेल्या संधीला मी फारस गांभीर्याने घेतलं नाही. मला त्यावेळी, जे यश मिळालं, ते कमावण्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत करतात. मला करीअरच्या सुरुवातीला आणि खूप सहजतेने यश मिळालं. यश माझ्याकडे चालून आलं, देवाने मला यश दिलं पण मी त्या बद्दल मी साधी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली नाही असे मला वाटते” असे भाग्यश्रीने सांगितले.
“मला यश मिळालं पण मी त्याची किंमत केली नाही. आता मी त्याकडे एक अनुभव म्हणून पाहते” असे भाग्यश्री म्हणाली. अभिनेत्री भाग्यश्रीचा आज वाढदिवस असून तिने ५२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘राधे श्याम’, कंगना रणौतचा ‘थलायवी’ या बिग बजेट चित्रपटांमधून भाग्यश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 7:03 pm