‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी भाग्यश्री आता सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. सलमानसोबत झळकलेली ही अभिनेत्री चक्क ‘बाहुबली’ प्रभाससोबत कमबॅक करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाग्यश्री तिच्या पतीमुळे सिनेसृष्टीपासून दूर होती. परंतु चाहत्यांच्या आग्रहास्तव तिने चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. अनेक वर्ष ती सिनेसृष्टीपासून दूर का होती याबाबतही तिने सांगितलं. ती म्हणाली, “सुरुवातीला माझे पती थोडे पजेसिव स्वभावाचे होते. चित्रपटांमधील माझे रोमँटिक सीन त्यांना आवडत नव्हते. त्यांनी कधी मला थेट विरोध केला नाही पण अप्रत्यक्षपणे ते नाराजी दर्शवायचे. ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर मला त्याच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. माझ्या पतीला अशा भूमिका आवडत नव्हत्या. शिवाय मी देखील तेच तेच काम करुन कंटाळली होती. अखेर मी काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात आम्हाला मुलं झाली. त्यानंतर मुलांचं पालन पोषण करण्यात अनेक वर्ष निघून गेली. त्यामुळे मी सिनेसृष्टीपासून बराच काळ दूर होती.”
भाग्यश्री आपल्या कमबॅक चित्रपटामध्ये अभिनेता प्रभाससोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाउनमुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवावे लागले. या चित्रपटाचे नाव व व्यक्तिरेखेसंदर्भात भाग्यश्रीने काहीही माहिती दिली नाही. येत्या काळात ती या चित्रपटाची अधिकृत घोषणा करेल त्यावेळी सर्वांनाच याबाबत समजेल असं ती म्हणाली. दरम्यान भाग्यश्रीच्या कमबॅकमुळे तिचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 11:47 am