18 January 2019

News Flash

आता ‘कॉमेडीक्वीन’ दिसणार वेगळ्या रुपात

भारतीने लग्नानंतर काही काळ आपल्या कारकिर्दीला ब्रेक दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा तिने आपल्या करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारती सिंह

हास्यसम्राज्ञी भारती सिंगने ‘द कपिल शर्मा शो’ या रिअॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ आणि  ‘कॉमेडी सर्कस’ या शोमुळे भारतीने प्रत्येक प्रेक्षकांच्या घरात स्थान मिळविले आहे. तिच्या अफाट विनोद बुद्धीमुळे तिने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही तर आपले एक विशिष्ट स्थानदेखील निर्माण केले आहे. भारतीने लग्नानंतर काही काळ आपल्या कारकिर्दीला ब्रेक दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा तिने आपल्या करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या विनोदांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारती सिंगने छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असला तरी ती यावेळी कोणत्याही कॉमेडी शोचा आधार न घेता एका वेगळ्याच वळणाच्या शोचा आधार घेताना दिसत आहे.
टेलिचक्कर या मनोरंजन संदर्भातल्या बातम्या देणाऱ्या वेबसाइटनुसार, भारती ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शो च्या ‘९’ व्या सिझनमधून  कमबॅक करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत पती हर्ष लिंबाचिया हा देखील या शोमध्ये भाग घेणार आहे. त्यामुळे ‘कॉमेडीक्वीन’ या शोमध्ये विनोद न करता साहसदृश्ये करताना दिसून येणार आहे.
लग्नानंतर  भारती अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून आली होती. या शोनंतर ती पती हर्षबरोबर युरोप टूरवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. या टूरवरुन परत आलेल्या भारतीने ‘खतरों के खिलाडी ९’ या शोमधून पुन्हा कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सतत काम केल्यामुळे मानसिक थकवा येत असतो. हा थकवा घालविण्यासाठी कामातून थोडा ब्रेक घेण्याची गरज असते, असे हर्ष लिंबाचियाने यापूर्वी सांगितले होते. मात्र युरोप टूरवरुन परत आलेल्या भारतीने ‘खतरों के खिलाडी’ या शोचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. परंतु निदान पुढील दोन महिने तरी ती अन्य कोणत्याही शोचा भाग होणार नसल्याचे यावेळी तिने स्पष्ट केले.
आतापर्यंत भारतीने तिच्या नवनवीन विनोदांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. परंतु ‘खतरों के खिलाडी’ हा शो कॉमेडी शोपेक्षा पूर्णत: वेगळा आहे. ‘खतरों के खिलाडी’ हा शो अमेरिकी ‘फियर फॅक्टर’ या शोचे हिंदी व्हर्जन आहे. या शोमध्ये काही टास्क देण्यात येतात. त्यामुळे या शोमध्ये भारतीचा निभाव लागेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published on May 17, 2018 3:58 pm

Web Title: bharti singh to be part with harsh limbachiyaa