बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. तसेच त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेक कलाकारांनी घराणेशाही या वादावर वक्तव्य केले. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी चित्रपट निर्माता करण जोहर आणि आलिया भट्टवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. आता अभिनेत्री पूजा भट्टने घराणेशाही या वादावर वक्तव्य केले आहे. तिने अभिनेत्री कंगना रणौतला भट्ट कुटुंबीयांनीच लाँच केले आहे असे म्हटले आहे.

नुकताच पूजा भट्टने ट्विटर करत तिचे मत मांडले आहे. ‘सध्याचा हॉट टॉपिक घराणेशाही यावर मला बोलण्यास सांगितले. ज्यावर लोकं आपला राग व्यक्त करत आहेत. पण अशा व्यक्तीला घराणेशाही वादावर बोलण्यास सांगण्यात आले आहे जो स्वत: अशा कुटुंबाशी संबंधित आहे. ज्या कुटुंबाने नव्या कलाकारांना, म्यूझिशियन आणि टेक्निशियन यांना लाँच केले आहे. मी यावर केवळ हसू शकते सत्य इतक्या लवकर स्वीकारले जात नाही. पण काल्पनिक गोष्टी स्वीकारल्या जातात’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले आहे. ‘कंगना एक चांगली अभिनेत्री आहे. जर ती एक चांगली अभिनेत्री नसती तर विशेष फिल्मच्या गँगस्टर चित्रपटाद्वारे तिला लाँच केले गेले नसते. अनुराग बासूने तिला शोधले. विशेष फिल्मने तिच्यामधील कौशल्य ओळखले आणि तिला लाँच केले. ही काही छोटी गोष्ट नाही. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘मित्रांनो नेपोटीझम हा शब्द इतरांसाठी वापरा. असे अनेक लोकं आहेत ज्यांना आमच्यामुळे चित्रपटसृष्टीचा मार्ग मिळाला. त्यापैकी अनेकांना आमची पात्रता काय आहे याची जाणीव आहे आणि जर कोणी विसरले असेल तर ते त्यांचे दुर्दैव आहे आमचे नाही’ असे पूजाने पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.