चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सर्व वयोगटामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना हसवण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे केले जाते. मात्र नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका भागात आगरी व्यक्तिरेखा साकारण्यात आली होती. ही व्यक्तीरेखा भाऊ कदम यांनी साकारली होती. या व्यक्तीरेखेमुळे आगरी आणि कोळी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे या समाजातील विविध संघटनांनी  भाऊ कदम यांची भेट घेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या भागात हे घडले होते. हा वाद जास्त पेटू नये यासाठी भाऊ कदम यांनी या समाजाची जाहीर माफी मागितली.

या कार्यक्रमाच्या एका भागात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ अधोक्षज भोईर यांचे विनोदी पात्र दाखवण्यात आले होते. हे नाव आगरी समाजात अतिशय अभावाने आढळते. आगरी पात्राद्वारे विनोदाची निर्मिती केल्यास आम्हाला काही हरकत नाही. पण कोणत्याही कार्यक्रमाद्वारे आगरी समाजावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही असे अॅड भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले. आमच्या समाजाचा अपमान केल्याप्रकरणी संबंधितांनी माफी मागावी अशी मागणी आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केली होती. त्यानुसार भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे. कार्यक्रमातही अशाप्रकारे जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे पत्र कार्यक्रमाच्या निर्मात्यांना देण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. झी मराठी वाहीनी आणि निर्माते यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नसून त्यांची प्रतिक्रीया काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.