मराठी रसिकांना हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम ही नावं काही नवीन नाही. या विनोदी बादशहांना एकत्र आणत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी ‘सायकल’ या सिनेमाचा प्रवास केला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये लहान मुलगी हृषिकेषला सायकलची गोष्ट सांगण्याचा हट्ट करते. मग सुरू होतो हृषिकेषचा सायकलची गोष्ट सांगण्याचा प्रवास. सायकलच्या या प्रवासात भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे प्रवासीही दिसतात.

‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ या सिनेमांचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. त्यांच्या या दोन्ही सिनेमांची प्रचंड चर्चा झाली. कॉफी आणि बरंच काही या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘& जरा हटके’ या सिनेमातून कुंटे यांनी एक प्रगल्भ प्रेमकथा मांडली होती. या सिनेमांनंतर प्रकाश आता ‘सायकल’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. हा टीझर पाहता सिनेमाही आश्वासक वाटत आहे.

या सिनेमाची निर्मिती व्हायकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि द स्टुडिओ यांनी केली आहे. सायकल या सिनेमाची कथा स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडातील आहे. या सिनेमात आपल्याला कोकणातील एका छोट्या खेड्यातील कथा पाहायला मिळणार आहे. हलका फुलका असा हा सिनेमा केशव एका विशेष पात्राभोवती फिरतो. केशवचे असून त्याचे त्याच्या सायकलवर अतिशय प्रेम आहे. सिनेमाची कथा अदिती मोघे यांनी लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. पोस्टरमध्ये प्रियदर्शन आणि भाऊ दोघेही साधूंच्या कपड्यात दिसले होते. हे दोघे भोंदू बाबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत का असा काहीसा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पोस्टरमध्ये प्रियदर्शन, हृषिकेश, भाऊ हे तिथेही सायकलवर बसलेले आहेत. प्रियदर्शनने भाऊला डबल सीट घेतले आहे तर हृषिकेश मात्र विरुद्ध दिशेने बसलेला आहे.