एकेकाळी मराठी कलाविश्वातील कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता तेच चित्र उलटं झाल्याचं दिसून येतं. मराठी चित्रपटांकडे अन्य भाषेतील कलाकारांचा ओघ वाढताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर आता चक्क भोजपुरी कलाकारांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होताना दिसून येतं. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ‘भयभीत’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.

सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘भयभीत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून भोजपुरी अभिनेत्री मधू शर्मा मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती डॉक्टर काव्या ही व्यक्तीरेखा साकारत आहे. मधू शर्माने आतापर्यंत विविध भाषांमधील चित्रपटात काम केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ती मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.

वाचा : ‘प्रियकराने मला मारहाण केली होती’; नीना गुप्तांनी सांगितली आपबिती

‘भाषा ही कोणत्याही कलाकारासाठी बंधनकारक नसते. भाषा महत्त्वाची न मानता कलाकाराने भूमिकेकडे बघावं. मी वेगळ्या भूमिकेच्या शोधात होतेच. त्यातच चित्रपट दिग्दर्शक दिपक नायडू यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवली. ही कथा ऐकल्यानंतर मला ती प्रचंड भावली. एखाद्या भयपटात काम करण्याची माझी फार इच्छा होती. ती भयभीतच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे, असं मधूने सांगितलं.

दरम्यान, मधूने ‘चॅलेंज’, ‘भाई द लॉन्ज’, ‘गुलामी’, ‘खिलाडी’, ‘कालीचरण’, ‘माँ तुझे सलाम’, ‘तिरंगा’, ‘योद्धा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भयभीत या चित्रपटात मधू, सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिपक नायडू करत असून निर्मिती शंकर रोहरा आणि दिपक नारायणी करत आहेत.