करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सहा महिन्याहून अधिक काळापासून देशातील चित्रपटगृहे बंद राहिल्यानंतर मागील महिन्यापासून हळूहळू वेगवेगळ्या राज्यांमधील चित्रपटगृहे नवीन नियमानुसार सुरु करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमध्येही काही ठिकाणी सिंगल स्क्रीन आणि मस्टीप्लेक्स चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे. येथील आझमगढमध्येही चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिलाच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक शोसाठी हाऊसफुल्लची पाटी लागली आहे. येथील मुरली सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’ च्या रुपाने पहिल्यांदाच भोजपुरी चित्रपट लावण्यात आला असून त्यालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटगृहाच्या मालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

लॉकडाउनच्याआधी मल्टीप्लेक्समध्ये प्रामुख्याने हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिलं जायचं. मात्र मागील अनेक महिन्यांपासून हिंदी चित्रपट प्रदर्शित न झाल्याने आता उत्तर प्रदेशमध्ये जेथे चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे तेथील मल्टीप्लेक्समध्येही भोजपुरी चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहे. यामध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’चाही समावेश आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेता म्हणून अर्थव सिंहने काम केलं आहे. अर्थव हा मुळचा आझमगढचाचा असल्याचे चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे. पहिल्याच दिवसाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला हाऊसफुलची पाटी लागल्याचे चित्र पहायला मिळलं. दुसरा आणि तिसऱ्या शोलाही प्रेक्षकांची चांगली गर्दी असल्याचे न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. मल्टीप्लेक्समध्ये असा प्रतिसाद मिळणारा ‘ससुरा बडा पइसा वाला २’ हा पहिलाच चित्रपट ठरला असून ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याच्या कामाईच्या आकड्यांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हा चित्रपट नक्कीच भोजपुरी बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘ससुरा बडा पइसा वाला २’ पाहण्यासाठी अनेकजण सहकुटुंब येत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही बरीच आहे. चित्रपटामधील अथर्वचा अभिनय अनेकांना आवडल्याचे दिसतेय. या चित्रपटामध्ये अथर्वने कॉलेमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. अथर्वबरोबरच चित्रपटातील प्रमुख नायिका म्हणून नेहा प्रकाश दिसत आहे.

१५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ससुरा बडा पइसा वाला’ या चित्रपटाने भोजपुरी चित्रपटांना मोठा आधार दिला होता. या चित्रपटाच्या यशामुळे भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये थोडा उत्साह निर्माण झाला आणि या यशामुळेच भोजपुरी चित्रपटही चांगली कामगिरी करु शकतात असा विश्वास निर्मात्यांमध्ये तयार झाला. आता १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माता, निर्देशक अजय सिन्हा यांनी ‘ससुरा बडा पइसा वाला २’च्या रुपात पुन्हा तेच काम केलं असल्याची चर्चा भोजपुरी चित्रपट चाहत्यांमध्ये आहेत. सध्या खासदार असणारे मनोज तिवारी हे ‘ससुरा बडा पइसा वाला’मुळे स्टार झाले त्याचप्रमाणे आता अथर्वलाही भोजपुरी चित्रपटांमध्ये चांगली संधी मिळेल असं त्याचं काम पाहून सांगितलं जात आहे.