मनवीर गुर्जरने ‘बिग बॉस रिआलिटी शो’च्या १०व्या पर्वावर आपले नाव कोरले. नोएडामधील अगाहपूर येथून आलेला हा युवक ‘बिग बॉस १०’ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला. मनवीर जिंकल्याची बातमी कळताच त्याच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या आई वडिलांनीतर गावभर मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. कॉंमन मॅन अशी ओळख घेऊन बिग बॉसच्या घरात गेलेला मनवीर आता सेलिब्रिटी झाला आहे. सेलिब्रिटी ‘मनवीर गुर्जर’ आता घरी कधी परततोय याची सर्व कुटुंबीय मंडळी वाट पाहत आहेत.

जवळपास साडे तीन महिने चाललेल्या बिग बॉसचा हा दहावा सिझन अखेर संपला आहे. यंदाचा बिग बॉसचा हा सिझन आधीच्या नऊ सिझनपेक्षा बराच वेगळा होता. ज्या १५ स्पर्धकांनी बिग बॉस हाउसमध्ये प्रवेश केला त्यापैकी अर्धेजणे ‘इंडिया वाले’ म्हणजेच ‘नॉन सेलिब्रिटी’ होते. अंतिम फेरीत पोहचलेल्या चार स्पर्धकांपैकी दोन स्पर्धक इंडिया वाले म्हणजेच मनू आणि मनवीर तर दोन सेलिब्रिटी स्पर्धक म्हणजे बानी आणि लोपा हे होते. पण, या चौघांमध्ये अखेर मनवीरनेच बाजी मारली. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी मनवीरला कोणी ओळखतही नव्हते. मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा येथे येण्यापूर्वी एक दुग्ध व्यावसायिक होता. प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवून मनवीर बिग बॉस १०चा विजेता बनला. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत सर्वापेक्षा वरचढ ठरला. मनवीर मुळचा नोएडाचा आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण काहीच योजना न करून आल्याचे मनवीरने सांगितले होते. मी इथे सर्वसामान्य राहणीमान जगेन. ज्यांना माझा अॅटीट्यूड आवडेल त्यांचे मी स्वागत करेन आणि ज्यांना नाही आवडणार त्यांना बाय बाय करेन, असे मनवीरने म्हटले होते. विशेष म्हणजे तो संपूर्ण सिझन तसाच वागला. मोनूसोबतची त्याची मैत्री पूर्ण सिझन चर्चेचा विषय राहिली. त्यांची ही मैत्री शोच्या शेवटपर्यंत टिकली.

१६ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती अशा दोन वर्गवारीतून स्पर्धक सहभागी झाले होते. सेलिब्रेटीसारखी सामान्य स्पर्धकालाही लोकप्रियता मिळू शकते हे मनवीरने शेवटच्या टप्प्यात दाखवून दिले.