बिग बॉसचे घर जेवढे भांडणांसाठी प्रसिद्ध आहे तेवढेच ते जवळीकींसाठीही प्रसिद्ध आहे. इथे अनेक चांगली नाती बिघडतात तर बिघडलेली नाती नव्याने सुधरायला लागतात. आता हेच पाहा ना काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात प्रियांक आणि बेनाफ्शामध्ये जवळीक वाढत चालली आहे.  हे दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत आहेत. दिवसा तर हे दोघं एकत्र वेळ घालवतातच पण रात्रीदेखील हे दोघं एकत्र वेळ घालवताना दिसतात.

बेनाफ्शासोबत वाढत चाललेली प्रियांकची जवळीक पाहून त्याची प्रेयसी दिव्या अग्रवालने त्याच्यासोबतची सारी नाती तोडून टाकली आहेत. ‘शोमध्ये सुरू असलेली प्रियांक आणि बेनाफ्शाची जवळीक पाहून मला खूप मनस्ताप होत असून मी या सगळ्या प्रकाराने दु:खी झाले, असंही ती म्हणाली.

‘स्पॉटबॉय’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांक बिग बॉसच्या घरात ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहून दिव्या फारच नाराज झाली आहे. ‘मी ज्या प्रियांकला ओळखायची तो हा प्रियांक नव्हेच. माझ्याप्रती त्याच्या सर्वच भावना खऱ्या होत्या मात्र तो सगळा दिखावा असल्याचं आता मला कळतंय, असं दिव्या म्हणाली.

https://www.instagram.com/p/BW4e-6kAcs8/

हे सर्व पाहिल्यानंतर दिव्याने आपला विचार बदलला. दिव्याच्या म्हणण्यानुसार आता तिच्यात आणि प्रियांकमध्ये काहीही नाही. ‘मला नाही वाटत प्रियांक खरा आहे. मी पूर्णपणे त्याच्यापासून दूर झाले आहे. तो आज बिग बॉसमध्ये जसे बेनाफ्शासोबत वागत आहे, तसाच तो माझ्यासोबतही स्प्लिट्सव्हिलामध्ये राहायचा. त्याला प्रत्येक शोमध्ये एक मुलगी हवी असते.’ एवढेच बोलून ती थांबली नाही. दिव्या पुढे म्हणाली की, जर प्रियांक हे फक्त गेमसाठी करत असेल तर हे फार चुकीचे आहे. तिथे दुसरे लोकही तोच गेम खेळत आहेत. पण त्यातले कोणीच असे काही करत नाही. हितेन आणि विकासही खेळत आहेत ना? ते दोघं मात्र मुलींशी अंगलगट करत नाहीत.