थरारक स्टंट्स आणि साहसी खेळामुळे ‘खतरों के खिलाडी – फीअर फॅक्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे दहावे पर्व आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी या कार्यक्रमाचे निवेदन करत असून यात साहसी खेळांचा एकेक टप्पा ओलांडत आहेत. विशेष म्हणजे हा सिझन संपला नाही तरदेखील प्रेक्षकांना पुढील सिझनची उत्सुकता लागली आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. ‘बिग बॉस 13’ मधील लोकप्रिय ठरलेल्या स्पर्धकाला ‘खतरों के खिलाडी’च्या पुढील सिझनची ऑफर आली आहे.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’कडे पाहिलं जातं. नुकतंच या शोचं १३ वं पर्व संपलं. मात्र या पर्वातील अनेक सेलिब्रिटी प्रकाशझोतात आले. त्यातलंच एक नाव म्हणजे पारस छाबडा. विशेष म्हणजे या शोनंतर पारस ‘खतरों के खिलाडी’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. एका इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट शोमध्ये पारसने याविषयी स्वत: सांगितलं.
“बिग बॉस हा शो सुरु असतानाचा मला दोन नव्या शोच्या ऑफर आल्या होत्या. त्यातील एक म्हणजे ‘खतरों के खिलाडी 11’ आणि दुसरी ‘मुझसे शादी करोगे’. या दोन्ही शोपैकी प्रथम ‘मी मुझसे शादी करोगे’ या शोची निवड केली आहे. हा शो झाल्यानंतर मी ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभाग घेईन. ‘बिग बॉस’च्या घरात मी ज्या धाडसीवृत्तीने टास्क पूर्ण करत होतो किंवा निर्णय घेत होतो, ते पाहून मला ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर मिळाली आहे”, असं पारसने सांगितलं.
पुढे तो म्हणतो, “या दोन शोव्यतिरिक्त मी लवकरच एका पंजाबी चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात माझ्यासोबत माहिरा शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे सारं काही बंद आहे. मात्र लॉकडाउन संपल्यानंतर कदाचित आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे वळू”. दरम्यान, तरुणींमध्ये पारसची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा जबरदस्त फॅनफॉलवर्स पाहायला मिळतो. अलिकडेच त्याचा आणि माहिरा शर्माचा एक व्हिडीओ प्रदर्शित झाला.