छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चं १३ वं पर्व नुकतंच सुरु झालं असून अभिनेत्री कोयना मित्राने रिलेशनशीपमध्ये असताना बॉयफ्रेंडने तिला प्रचंड मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. इतकंच नाही तर तो अनेक वेळा तिला बाथरुममध्ये बंद करुन ठेवायचा असंही तिने सांगितलं. बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि दलजीत कौर यांच्याशी गप्पा मारत असताना कोयनाने तिच्यावर ओढावलेल्या या प्रसंगाचं कथन केलं.

यावेळी कोयनाने सांगितलं की तिचा प्रियकर तुर्कीमधील होता आणि तो प्रचंड पझेसिव्ह होता. अनेक वेळा तो कोयनाला मारहाण करत असते. इतकंच नाही तर त्याने एकदा तिला बाथरुममध्ये कोंडूनही ठेवलं होतं. त्याच बरोबर अनेक वेळा तो तिला तुर्कीला घेऊन जाण्याची धमकी द्यायचा. तुर्कीला गेल्यानंतर तो तिच्यासोबत लग्न करेल आणि तिचा पासपोर्ट जाळून टाकेल असंही त्याने तिला सांगितलं होतं.

कोयनाने तिच्या प्रियकराविषयी जे अनुभव सांगितले ते प्रचंड धक्कादायक असल्याचं बिग बॉसच्या एका स्पर्धकाने सांगितलं. परंतु कोयनाने प्रियकरासोबत ब्रेकअप केला असून आता पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार नसल्याचंही तिने सांगितलं.

दरम्यान, ‘साकी साकी’ या गाण्यामुळे कोयना प्रकाशझोतात आली. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या गाण्याव्यतिरिक्त ती ‘मुसाफिर’ (२००४), ‘इंसान’ (२००५), ‘एक खिलाड़ी एक हसीना’ (२००५), ‘अपना सपना मनी मनी’ (२००६) आणि ‘अनामिका- द अनटोल्ड स्टोरी’ (२००८) या चित्रपटांमध्ये झळकली आहे.