छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या शोच्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं आपलं नाव कोरलं आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रंगला. अंतिम फेरीत नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले होते. गेल्या १०० दिवसांपासून हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहात होते.

सहा स्पर्धकांपैकी आरोह व किशोरीताई सर्वांत आधी घराबाहेर पडले. शिव, नेहा व वीणा हे टॉप तीन स्पर्धकांमध्ये पोहोचले. या तिघांनाही पाच लाख रुपये स्वीकारून घराबाहेर जाण्याची संधी देण्यात आली. पण तिघांनीही ही ऑफर नाकारली. त्यानंतर वीणा बाद झाल्याचं महेश मांजरेकरांनी घोषित केलं. नेहा व शिव हे दोघंच बिग बॉसच्या घरात राहिले होते. अखेर शिवने बाजी मारली. शिवला १७ लाख रुपये बक्षिसरुपी मिळाले.

शिव ठाकरेचा रंजक प्रवास
अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे घरात प्रवेश केल्यापासूनच लोकप्रिय ठरला आहे. ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून तो चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता. वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली आहे. बिग बॉसनंतर हे दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले. किशोरी शहाणे ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावर थिरकल्या तर हिना पांचाळने ‘साकी साकी’ आणि अभिजीत बिचुकलेने ‘सारा जमाना’ या गाण्यावर डान्स सादर केला. तसंच अभिजीत केळकर, वैशाली म्हाडे, रुपाली जाधव, माधव देवचके, मैथिली जावकर यांचेही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले.