बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच घरातील काही स्पर्धकांची नावं बरीच चर्चेत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे विनीत भोंडे. छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करणे, कॅप्टन असताना सारखी टीम मीटींग आयोजित करणे, मुद्दा सांगण्यात स्पष्टता नसणे, कॅप्टन असताना वा नसताना माईक विसरणे यांसारख्या गोष्टींमुळे विनीत कायम चर्चेत राहिला. विनीतला घराबाहेर पडण्याआधी बिग बॉसने माईक विसरण्याच्या सवईमुळे एक शिक्षादेखील दिली. ही जरी सर्व कारणं असली तरी काही सदस्यांना तो आवडायचा आणि त्यामुळेच त्याची लोकप्रियता अल्पावधीत वाढली होती. परंतु, या आठवड्यात त्याला पुरेशी मतं न मिळाल्याने घराबाहेर जावं लागलं.

बिग बॉसच्या घरातून जसजसा एकेक सदस्य बाहेर पडत आहे तसतसं घरातील वातावरण बदलत जात आहे. पण हा खेळ असाच सुरू राहणार आहे. कार्यक्रमाच्या नियमांनुसार प्रत्येक आठवड्याला एक स्पर्धक बाद होणार आणि बेघर होणार हे निश्चित आहे. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मतं दिली. पण ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला घराबाहेर पडणं अनिवार्य होतं. त्यामुळेच विनीतला घराबाहेर जावं लागलं.

#DusKaDum : ‘जिसे जिंदगी सिखायें, उसे कौन हराये?’

विनीत घराबाहेर पडल्यानंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केलं. आता येत्या आठवड्यात अनिल थत्तेंबरोबर कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.