‘पद्मावती’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधाला दर दिवशी नवे वळण मिळत असल्याचे पाहायला मिळते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा शिरच्छेद करण्याच्या आणि त्यांना जिवंत जाळण्याच्या धमक्याही देण्यात येत आहेत. करणी सेनेमागोमाग आता बऱ्याच नेतेमंडळींनीही या चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हरयाणातील भाजप नेते सुरज पाल अमू यांनी तर राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामागोमागच आता त्यांनी आणखी एक धमकी दिली आहे.

“चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करणाऱ्या अशा चित्रपटांचा नायनाट करण्याची ताकद आजच्या युवा पिढीमध्ये आणि योद्ध्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाशी हे काम फारच मिळतेजुळते आहे”, असे वक्तव्य करत अमू यांनी पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधले.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…

‘पद्मावती’ या चित्रपटातून भन्साळी एका ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, त्यांनी या चित्रपटातून राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृतीची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली असून, अलाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीमध्ये काल्पनिक दृश्य साकारली आहेत, असा आरोप लावत या चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे. पण, भन्साळींनी मात्र सुरुवातीपासूनच आपल्या भूमिकेवर ठाम राहत इतिहासाची छेडछाड करणारे कोणतेही चुकीचे दृश्य या चित्रपटात नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही एकंदर परिस्थिती पाहता आता या चित्रपटाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.