बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतला नोटीस बजावली आहे. कंगनाचं मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या कार्यालयाबाहेर बीएमसीने नोटीस लावली आहे. सोमवारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिल येथे असलेल्या कार्यालयाची पाहणी केली होती. त्यानंतर आज तिच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे.

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाबाहेर ३५४ अ अंतर्गंत नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमांनुसार न झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. या नोटीसचे काही फोटो कंगनाने ट्विटरवरदेखील शेअर केले आहेत.

दरम्यान, मुंबईतील पाली हिल येथे कंगनाचं कार्यालय असून ‘मणिकर्णिका फिल्म’ असं तिच्या कार्यालयाचं नाव आहे. कंगनाने जानेवारी महिन्यात या कार्यालयाचं उद्धाटन केलं होतं. सध्या या कार्यालयात काम सुरु होतं. मात्र त्यापूर्वीच पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या ऑफिसची झाडाझडती घेतली. सध्या कंगना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं असून अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील तिला खडेबोल सुनावले आहेत.