लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे, असा धोशा बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार गेले अनेक दिवस लावत आहेत. जणू काही समाजातील ‘अज्ञजनां’ना उपदेशाचे डोस पाजणे हेच आपले अवतारकार्य असल्याचा या ‘तारकादळा’चा थाट असतो. मात्र, प्रत्यक्षात यातलेच अनेक तारेतारका स्वत: मात्र मतदानाला दांडी मारण्याच्या तयारीत मग्न आहेत. ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी’चाआयफा पुरस्कार वितरण सोहळा २३ ते २६ एप्रिलदरम्यान अमेरिकेत होणार असून अनेक कलाकार मुंबईतील मतदानाला बगल देऊन अमेरिकेत जाण्यासाठी सज्ज होत आहेत.
अमेरिकेतील ताम्पा बे येथे २३ ते २६ एप्रिल या कालावधीत १५वा ‘आयफा’ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. वेगवेगळ्या गटांत हिंदी चित्रपटांसाठी पारितोषिके देऊन कलाकार, तंत्रज्ञ यांचा गौरव करण्याचा हा सोहळा गेली १४ वर्षे परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. या पुरस्कार सोहळ्याने वेगळी ओळख निर्माण केली असल्याने बॉलीवूडमध्ये त्याचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे यंदाही २३ ते २६ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक कलाकार अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे २४ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी यांपैकी अनेक कलाकार साहजिकच अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ‘आयफा’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तारखा जाहीर  करण्यात आल्या होत्या, असा खुलासा आयोजकांनी केला आहे. या सोहळय़ाचे आयोजक विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंटच्या मुंबई कार्यालयात संपर्क साधला असता प्रतिक्रियेसाठी कोणी उपलब्ध झाले नाही.
मतदानाला यांची दांडी
शाहिद कपूर, फरहान अख्तर (मुख्य सोहळ्याचे सूत्रसंचालन)
सैफ अली खान (तांत्रिक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन)
माधुरी दीक्षित-नेने, ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा, करिना कपूर, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बासू (नृत्य व अन्य कार्यक्रम)