‘सैराट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात करण्याऱ्या नागराज मंजुळे यांनी लवकरच हिंदी कलाविश्वातही पदार्पण करण्याची तयारी दाखवली आहे. ‘सैराट’च्या निमित्ताने एक वेगळ्याच वास्तवदर्शी कथानकाचं सादरीकरण केल्यानंतर ते ‘झुंड’ या हिंदी चित्रपटासाठी सज्ज झाल्याचं कळत होतं. किंबहुना लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालासुद्धा सुरुवात होण्याची चिन्हं होती. पण, अचानकच नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या सुरुवातीलात एक धक्का बसल्याचं कळत आहे.

‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं म्हटलं जात होतं. पण, आता मात्र त्यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याचं कळत आहे. ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीपासूनच बिग बींनी या चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली होती. पण, कोणतंही कारण न देता या चित्रपटाचं चित्रीकरण वारंवार लांबवलं जात होतं. शिवाय इतर चित्रपट निर्मात्यांनाही त्यांनी आपल्या तारखा देणं अपेक्षित होतं. त्यामुळे फार काळ प्रतिक्षा न करता त्यांनी आता या चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते या चित्रपटापासून मागे फिरण्यामागे आणखीही काही कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये कॉपीराइटचाही महत्त्वाचा मुद्दा असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता ‘झुंड’ साकारणाऱ्या मंजुळेंपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे, असं म्हणावं लागेल.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

खुद्द नागराज मंजुळे, बिग बी किंवा ‘झुंड’च्या टीमकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, तरीही आता या चित्रपटाविषयी बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे, हे खरं. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.