कला, क्रिडा आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय. कामगिरी बजावणाऱ्या अनेक व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यात आले आहेत. मुळात चित्रपटांच्या माध्यमातून अशा बऱ्याच व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पण, या चित्रपटांचा प्रभाव किंवा मग प्रस्थ आता इतकं वाढलं आहे, की थेट शालेय अभ्यासक्रमातही त्याचेच पडसाद उमटताना दिसत आहेत. खुद्द अभिनेता फरहान अख्तरनेच याविषयीची खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमधील शालेय पुस्तकांमध्ये ज्येष्ठ धावपटू आणि ‘फ्लाइंग सीख’ म्हणून खुद्द मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी अभिनेता फरहान अख्तरचा फोटो दाखवण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहानने मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा मोठ्या ताकदीने साकारली होती. पण, अशा पद्धतीने शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात येत असल्याबद्दल फरहानने नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटरवर एका युजरने जेव्हा याविषयीचा फोटो पोस्ट केला तेव्हा या प्रकरणावर प्रकाशझोत टाकण्यात आला. ज्यानंतर फरहानने ट्विट करत लिहिलं, ‘पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांकडे मी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकात मिल्खा सिंग यांच्याऐवजी जो फोटो छापण्यात आला आहे तो कृपया बदलावा आणि पुस्तकाच्या चुकीच्या प्रती परत घ्याव्यात.’

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं पडलेलं महागात – नीना गुप्ता

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच या सर्व प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. मुळात शालेय आयुष्यात अभ्यासक्रमातूनच काही महत्त्वाच्या आणि तितक्याच अभिमानास्पद गोष्टींची, इतिहासाची आपल्याला माहिती मिळते. देशाची पुढची पिढी ही त्याच ठिकाणहून घडत असते. पण, तिथेच अशी चुकीच्या पद्धतीची माहिती देण्यात येत असल्यामुळे सध्या अनेकांनीच पश्चिम बंगाल शिक्षण मंडळावर आगपाखडही केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor farhan akhtar highlights glaring error in a bengali school textbook leaves twitterati shocked
First published on: 19-08-2018 at 16:32 IST