आमिरचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान खानवर सध्या अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे या शुभेच्छा त्याला एखाद्या भूमिकेसाठी किंवा चित्रपटासाठी नव्हे तर चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळे दिल्या जात आहेत. तुम्हीही झालात ना आश्चर्यचकीत? त्याचं झालं असं की, पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं. या दोघांच्या नावातील साम्यामुळे काहींचा गोंधळ उडाला आणि त्यांनी अभिनेता इम्रानला शुभेच्छा दिल्या.

इम्रान खान यांच्या तेहरीक- ए- इंसाफ या पक्षाला पाकिस्तानच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या. येत्या १४ ऑगस्टला ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नावावरून उडालेल्या गोंधळामुळे अनेकांनी अभिनेता इम्रानला शुभेच्छा देणारे अनेक मेसेज आणि ई- मेल केले. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट टाकत इम्रानने स्वत: हा संभ्रम दूर केला आहे.

एका चाहत्याने पाठवलेल्या ई- मेलचा स्क्रिनशॉट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान साहेब, एक यशस्वी नेता योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. त्याला खऱ्या समर्थकांची आणि सहकाऱ्यांची पारख असते आणि विश्वासू लोकांची टीम तो बनवतो. मी तुमच्या टीममध्ये येण्यास उत्सुक आहे,’ असं या ई- मेलमध्ये लिहिलं आहे.

Sacred Games Row: राजीव गांधींबद्दलचे ते आक्षेपार्ह संवाद काढणार नाही, नेटफ्लिक्स ठाम

या फोटोच्या कॅप्शनमध्ये इम्रानने लिहिलं की, ‘आता मी जास्त वाट पाहू शकत नाही. याच आठवड्यापासून मी माझ्या धोरणा आखण्यास सुरूवात करेन आणि याबाबची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत राहीन.’ अर्थात इम्रानने हे उपहासात्मक लिहिलं आहे.