‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला असतानाच आता या चित्रपटाबाबतच्या काही चर्चा सर्वांसमोर येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून दिग्दर्शक अनुराग बासूने एक वेगळं कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व उत्साहपूर्ण वातावरणात आता एका वादामुळे गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेता गोविंदाच्या या चित्रपटातील भूमिकेवर कात्री चालवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत रणबीरने गोविंदाची माफी मागितली आहे.

‘जग्गा जासूस’च्या प्रसिद्धीच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणबीरने याविषयी त्याचं मत मांडलं. ‘चित्रपटातील गोविंदाची भूमिका माझ्या आणि अनुराग दाच्या सांगण्यावरुन काढण्यात आली’ असं रणबीरने सांगितलं. चित्रपटाच्या अपूर्ण संहितेसोबतच त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली होती. पण, ज्यावेळी संहिता पूर्ण झाली तेव्हा कथानकात काही बदल करण्यात आले होते, त्यातही चित्रपट साकारण्यासाठी फार उशीरही झाला होता. या सर्व प्रकाराबद्दल रणबीरने आपल्या बेजबाबदार वागण्याला दोष दिला आहे. चित्रपटाच्या हिताच्याच दृष्टीने मला विचार करावा लागला आणि त्यामुळे गोविंदाची भूमिका आम्हाला वगळावी लागली असं रणबीरने स्पष्ट केलं.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग बासूनेही याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. ‘हा चित्रपट घडायला एवढा वेळ लागला की त्याचे कथानक प्रत्येक वेळी बदलण्यात आले. आता कथानक बदलण्यामुळे गोविंदाची भूमिका वगळण्यात आली’, असं त्याने सांगितलं होतं. सध्या या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. रणबीर आणि कतरिनाची केमिस्ट्री त्यासोबतच या चित्रपटाचं संगीत, कथानक मांडण्याची एकंदर पद्धत याचा फायदा आता चित्रपटांना कितपत होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.