27 September 2020

News Flash

“मृत्यूनंतर मला खांदा देणारं कोणी नसेल”, ऋषी कपूर यांचे ते शब्द दुर्दैवाने खरे ठरले

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी सकाळी जगाचा निरोप घेतला

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. गुरुवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बॉलिवूसह त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. बुधवारी इरफान खान यांचं निधन झालं. दोन दिवसात बॉलिवूडच्या दोन जबरदस्त अभिनेत्यांचं निधन झाल्याने अनेकांनी विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचं २०१७ मधील एक ट्विट व्हायरल होत आहे. त्या ट्विटमध्ये ऋषी कपूर जे बोलले होते ते दुर्दैवाने खरं ठरलं आहे.

झालं असं होतं की, ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नव्या पिढीतील एकही अभिनेता हजर नव्हता. यामुळे ऋषी कपूर प्रचंड नाराज झाले होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, “लज्जास्पद…नव्या पिढीतील एकाही अभिनेत्याने विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही. यामधील अनेकांनी तर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आदर देणं शिकलं पाहिजे”.

यानंतर संतापलेल्या ऋषी कपूर यांनी अजून एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला तयार झालं पाहिजे. कोणीही मला खांदा देणार नाही. स्टार्स म्हणवून घेणाऱ्या या सर्वांवर मी प्रचंड नाराज आहे”.

दुर्दैवाने ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर ते शब्द खरे ठरले आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्या अनेक नातेवाईक, चाहत्यांना त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली होती. मरिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूडमधील कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण त्यांचं अंत्यदर्शन करु शकलो नाही याचं दुख:ही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 5:27 pm

Web Title: bollywood actor rishi kapoor 2017 tweet goes viral sgy 87
टॅग Rishi Kapoor
Next Stories
1 अखेर लेक रिधिमाला मिळाली विशेष परवानगी; प्रायव्हेट जेटने गाठणार मुंबई
2 ऋषी कपूर यांची ही इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर
3 “आमची हॅटट्रीक होऊ शकली नाही”; ऋषी कपूर यांच्या आठवणीनं तापसी भावनाविवश
Just Now!
X