काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवण्यात आल्यानंतर आता यापुढे कोणतं पाऊल उचललं जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयाची सुनावणी दिल्यानंतर अनेकांच्याच मनात सलमानच्या आगामी कार्यक्रम आणि चित्रपटांचं काय होणार हा प्रश्न घर करुन राहिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला एकट्या सलमान खानवर विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून ५०० कोटीहून अधिक रुपये लावण्यात आले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त विविध रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणारा हा भाईजान येत्या काळात ‘दस का दम’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, आता मात्र हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच त्याच्यासमोर काही अडचणी उभ्या ठाकल्याची चिन्हं आहेत.

वाचा : सलमानवर इंडस्ट्रीचे लागलेत ५०० कोटी

‘टाइम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस ११’च्या एका भागासाठी सलमानला ११ कोटी रुपये इतकं मानधन आकारलं जात होतं. त्याचप्रमाणे ‘दस का दम’च्या २६ भागांसाठी सलमानला एकूण ७८ कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार असल्याचं कळत आहेत. या रकमेची फोड केली असता लक्षात येतंय, की कार्यक्रमाच्या एका भागासाठी सलमानच्या वाट्याला तीन कोटी रुपये येणार आहेत. पण, न्यायालयाची सुनावणी आणि त्यापुढील परिस्थिती पाहता ‘दस का दम’च्या वाटेतील अडचणी दूर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्याच वर्षी जून महिन्यात ‘दस का दम’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंबहुना या शोच्या प्रोमोचं चित्रीकरणही झाल्याचं कळत आहे. पण, आता शोच्या भवितव्यावर मात्र प्रश्नचिन्हं उदभवलं आहे.