महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १९ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शाहरुख खान, आमीर खान आणि कंगना रणौत उपस्थित होते. या भेटीमध्ये कलाकारांनी पंतप्रधानांसोबत गांधी विचारांवर चर्चा केली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर कलाकारांसोबतचा एक सेल्फीही शेअर केला आहे.

महात्मा गांधी याचे विचार आज दूरपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खूप चांगले काम केले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यासोबतच त्यांनी उपस्थित कलाकारांना दांडी येथे बांधण्यात आलेल्या संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचंही आवाहन केलं.

‘पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट छान झाली. त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायक आहे,’ असं आमिर खान म्हणाला.


‘कलाकार आणि कला यांना समजून घेणारं हे पहिलंच सरकार आहे. कदाचित यापूर्वी असे पंतप्रधान पाहण्यात आले नाहीत. चित्रपट उद्योगाला यापूर्वी असा सन्मान कोणीही दिला नसावा’, त्यामुळेच मी संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानते, असं कंगना म्हणाली.

दरम्यान, यावेळी शाहरूख खान, आमीर खान, कंगना रणौत, जॅकलीन फर्नांडिस, एकता कपूर, इम्तियाज अली, अनुराग बसू, बोनी कपूर, सोनम कपूर यांच्यासह सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.