विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीत अभिनेत्री आलिया भट्टचा ‘राजी’ हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली असून, आता या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०१८ या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार करणारा ‘राजी’ हा चौथा चित्रपट ठरला असून, बॉक्स ऑफिसवर काही विक्रमांनाही त्याने गवसणी घातली आहे.

एका वेगळ्याच कथानकाला न्याय देत महिला पात्राची मध्यवर्ती भूमिका असणारा ‘राजी’ हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटाने १०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. आलिया भट्टच्या कारकिर्दीतील १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा ‘राजी’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

वाचा : चेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार ११ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजी’ या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याअखेर १०२.५० कोटींचा गल्ला जमवला. रविवारी आयपीएलचा अंतिम सामना असूनही या चित्रपटाने ४.४२ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘राजी’ची ही घोडदौड कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. आलिया भट्टसोबतच ‘राजी’मधील अभिनेता विकी कौशलच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे संबंध आणि एका हेराची कथा या अतिसंवेदनशील मुद्द्यांना मोठ्या प्रभावीपणे हाताळत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे असंच म्हणावं लागेल.