भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच विवाहबंधंनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या ‘डेस्टिनेशन वेडिंग’ला मोजक्या पाहुण्यांचीच उपस्थिती पाहायला मिळाली. किंबहुना माध्यमांमध्येही त्यांच्या लग्नाची फारशी माहिती देण्यात आली नव्हती. पण, शेवटी विराट आणि अनुष्कानेच त्यांचे लग्न झाल्याचे जाहीर करत ही आनंदाची बातमी दिली.

दोघांनीही सुरेख फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपण आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचे सर्वांना सांगितले. इतकेच नव्हे तर, त्यांनी सर्वांचे आभारही मानले. त्यावेळी या नवविवाहित दाम्पत्याच्या ‘वेडिंग लूक’वरच अनेकांच्या नजरा खिळल्याचे पाहायला मिळाले. विराट आणि अनुष्काने पोस्ट केलेले हे फोटो म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आठवण. सहजीवनाच्या प्रवासाला देवाब्राह्मणांच्या साक्षीने सुरुवात केलेले ते अविस्मरणीय क्षण विरुष्काने सर्वांसोबत शेअर केले. पण, त्याचा आनंद सोशल मीडिया आणि चाहत्यांच्याच चौकटीपर्यंत सीमीत न ठेवता त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

https://www.instagram.com/p/Bcl1MIjFj5E/

विराट आणि अनुष्का त्यांचा लग्नाचे हे फोटो एका अमेरिकन फॅशन मासिकाला विकणार असून त्यातून येणारे पैसे ते समाजोपयोगी आणि महत्त्वाच्या कामांसाठी देऊ करणार आहेत. या दोघांनी आतापर्यंत समाजोपयोगी कामांमध्ये बऱ्याचदा हातभार लावला आहे. त्यातच आता लग्नाच्या फोटोंचा वेगळ्याच पद्धतीने वापर करत त्यांनी खऱ्या अर्थाने एक नवा पायंडा घातला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या निर्णयाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. लग्नाविषयी कमालीची गोपनियता ठेवली असली, तरी या नात्याची नवी सुरुवात करत असताना त्या आनंदात सर्वांनाच सहभागी करुन घेण्याची ‘विरुष्का’ची ही शक्कल खरच स्तुत्य आहे.

https://www.instagram.com/p/Bcl19saFhY2/