20 November 2017

News Flash

जाहिरात असो वा क्रिकेट दौरा, विराटची नजर तिच्यावरुन काही केल्या हटेना

हे फोटो साखरपुडा किंवा लग्नसमारंभातील तर नाहीत ना?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 9:30 AM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला खरा. पण त्या एका चित्रपटाच्या अपयशाने खचून न जाता अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. प्रियकर विराट कोहलीसोबत सुट्टीचा आनंद घेऊन परतलेलली ‘बबली गर्ल’ अनुष्का पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागलीये. श्रीलंकेला सुट्टीचा आनंद घेत असताना अनुष्का आणि विराटने त्यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नव्हता. पण, चाहत्यांनी मात्र मोठ्या चपळाईने ‘विरुष्का’चे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामागोमाग आता त्यांचे नवे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे फोटो साखरपुडा किंवा लग्नसमारंभातील तर नाहीत ना, असाच प्रश्न अनेकांना पडला. पण, तसं नाहीये.

सहसा आपल्या नात्याला कोणापासूनही न लपवणारं हे कपल आता थेट एका जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या काही फॅन पेजवर आतापासूनच या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अनुष्काचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय, तर विराटही काळ्या रंगाच्या बंदगळा शेरवानीमध्ये सुरेख दिसतोय. अनुष्काचा हा लूक चाहत्यांसोबतच विराटलाही घायाळ करुन गेलाय, असं म्हणायला हरकत नाही. कारण, व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये विराट तिला एकटक न्याहाळताना दिसतोय. त्यामुळे जाहिरात असो वा क्रिकेट दौरा विराटची नजर काही केल्या अनुष्कावरुन हटत नाहीये, असंच दिसतंय.

दरम्यान, या फोटोंमध्ये ‘विरुष्का’ची एकंदर वेशभूषा पाहता ही जाहिरात दिवाळी आणि सण- उत्सवाच्या वातावरणावरच बेतलेली असावी, असा अंदाज बांधण्यात येतोय. जाहिरातीची नेमकी संकल्पना अद्यापही कोणाला कळू शकली नाहीये. पण, तरीही ती पाहण्यासाठीची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. एखाद्या चित्रपटाचा टिझर पाहून ज्याप्रमाणे प्रेक्षकांमध्ये त्याबद्दलची उत्सुकता असते अगदी तशीच उत्सुकता विरुष्काच्या या जाहिरातीच्या बाबतीतही पाहायला मिळतेय.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

First Published on September 13, 2017 9:30 am

Web Title: bollywood actress anushka sharma is all smiles during a tvc shoot cricketer boyfriend virat kohlis eyes fixed on her see photos