अभिनेत्री कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती, असं सांगत उच्च न्यायालयानं कारवाई बेकायदेशीर ठरवली. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर करून केलेली कारवाई मान्य केली जाऊ शकत नाही,” असं न्यायालयानं कारवाईची नोटीस आणि आदेश रद्द केले. त्याचबरोबर या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत व कंगना रणौत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून समज दिली होती. दरम्यान, त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनावर टीका केली होती.

किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला पुन्हा एकदा कंगनानं उत्तर दिलं आहे. “मी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारची कायदेशीर कारवाया, अपमान सहन केला आहे की मला बॉलिवूड माफीया, आदित्य पांचोली आणि ऋतिक रोशनसारख्या व्यक्तीही आता चांगल्या वाटू लागल्या आहेत. मला माहित नाही माझ्यात इतकं काय आहे जे लोकांना इतकं त्रास देतं,” असं कंगना म्हणाली. किशोरी पेडणेकर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या महापौर?

“एक अभिनेत्री जी हिमाचलमध्ये राहते आणि इकडे येऊन आमच्या मुंबईची तुलना पीओकेशी करते. त्यानंतर जे लोकं न्यायालयाला राजकीय आखाडा बनवू पाहत आहेत ते चुकीचं आहे. ही सूडबुद्धीनं केलेली कारवाई वगैरे काही नाही. न्यायलयानं जो काही निकाल दिला आहे त्याचा आम्ही अभ्यास करू आणि ३५४ ए बाबत यापूर्वी न्यायालयानं कोणकोणते निर्देश दिले हेदेखील आम्ही पाहू,” असंही त्या म्हणाल्या.