काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचारावर आता बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाची प्रतिक्रिया आली आहे. प्रिती झिंटाने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली असून दोषींना योग्य ती शिक्षा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सोमवारी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडित यांची गोळ्या घालून हत्या केली. ४० वर्षीय अजय पंडित यांना घरापासून ५० मीटर अंतरावर गोळ्या घालून ठार करण्यात आलं.

“अनंतनाग येथे नुकतीच एका सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मी दु: खी आणि अस्वस्थ आहे. या दु:खाच्या क्षणी मी कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करते. कुटुंबाला योग्य तो न्याय आणि दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे”.

याआधी कंगना रणौतने या घटनेवर बॉलिवूडवर निशाणा साधला होता. “बॉलिवूडचे लोक हातात मेणबत्ती घेऊन, कार्ड घेऊन बाहेर रस्त्यांवर पडतात. पण त्यांचा जिहादी अजेंडा असतो. एरव्ही कोणाच्याही मदतीला ते बाहेर येत नाहीत, जोपर्यंत त्यामागे कोणताही अजेंडा नसतो,” अशा शब्दात कंगनाने संताप व्यक्त केला होता. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सरपंच अजय पंडित यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्याय देण्याची तसंच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत बुद्धिजीवी लोकांनी मौन का बाळगलं आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे. “अनंतनागमध्ये झालेल्या काश्मिरी पंडित सरपंचाच्या हत्येने मी फार दु:खी आहे. या घटनेचा मला संतापही येतोय. भर रस्त्यात त्यांच्यावर गोळी झाडली. १९ जानेवारी १९९० रोजी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. काश्मीरमध्ये भरदिवस असे अनेक लोक मरतात असं किमान आता म्हणू नका. इतकी मोठी घटना होते आणि यावर कोणीच व्यक्त होत नाही, याचं फार आश्चर्य वाटतंय”, असं ते या व्हिडीओत म्हणत आहेत.