मानवाचा वंश पुढे नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मासिक पाळीविषयी आजही बऱ्याच जणांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळतो. त्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून सॅनिटरी पॅड, मासिक पाळी हे विषय चर्चेत आले आहेत. अचानक या मुद्द्यांवर सोशल मीडियावरही उघडपणे बोललं जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे जीएसटी. सरकारने नव्याने लागू केलेल्या करप्रणालीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवर १२ टक्के जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर लागू केला आहे. ज्याचा सध्या सर्वच स्तरांतून विरोध केला जातोय. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत.

नुकत्याच एका कार्यक्रमाला माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्री रिचा चड्डाला यासंदर्भातच एक प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने थेट शब्दांत जीएसटी आकारला जाऊ नये असं म्हटलं. याविषयी आपलं मत मांडताना रिचा म्हणाली, ‘माझं यावर असंच मत आहे की, जर पुरुषांना मासिक पाळी आली असती तर सॅनिटरी नॅपकिनवर कर आकारण्यात आला नसता.’ यापुढेही तिने याविषयी ‘सर्वांच्याच आयुष्यात आई आहे. किंबहुना महिलांच्या शरीरातूनच सर्वांचा जन्म होतो. म्हणजे मासिक पाळीमुळेच वंश पुढे जातो आणि त्यासाठी महिलांकडून कर आकारला जाणार?’, असं म्हणत एक महत्त्वाचा प्रश्नही सर्वांसमोर उपस्थित केला.

रिचा नेहमीच तिच्या ठाम वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यावेळीसुद्धा माध्यमांसमोर तिने सॅनिटरी नॅपकिन्सवर १२ टक्के कर आकारला जाऊ नये, असं म्हणत ही काही उधळपट्टी करण्याची गोष्ट नसून ही गरज आहे, हा महत्त्वाचा मुद्दा सर्वांसमोर ठेवला. तेव्हा आता याविषयी इतर कलाकारही त्यांची काय मतं मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जीएसटी लागू होण्यापूर्वी सॅनिटरी नॅपकिन्सवर ५ % कर आकारला जायचा. पण, नव्या करप्रणालीनुसार करात थेट १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरातून सरकारच्या या नव्या करप्रणालीचा विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील महिलांनी पंतप्रधानांना सॅनिटरी नॅपकिन पाठवून या साऱ्याचा विरोध केला होता.