18 January 2019

News Flash

‘किसिंग असो किंवा न्यूड सीन, माझ्या पतीचा आक्षेप नसतोच’

मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं, याचा अर्थ असा नाही की लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

सुरवीन चावला

आपल्या बोल्ड अदांसाठी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. जानेवारी महिन्यात सुरवीनने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या. मुळात तिच्या लग्न झाल्याच्या चर्चांनी अनेकांनाच धक्का बसला. २०१५ मध्येच सुरवीनने अक्षय ठक्कर या तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं होतं. सहसा अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्यानंतर कलाविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. पण, सुरवीनने यातही तिचं वेगळेपण सिद्ध केलं.

लग्नानंतर प्रथमच सुरवीनने तिच्या आणि अक्षयच्या नात्याविषयी खुलेपणाने बोलत आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला. मुख्य म्हणजे लग्नानंतर आपल्या आयुष्यात फार काही कमालीचे बदल झाले नाही आणि बदल झाले असले तरीही ते सकारात्मकच होते, असं तिचं म्हणणं आहे.

‘माझ्या लग्न करण्यामुळे इतरांनी थक्क होण्याचं कारणच नाही. ते दिवस गेले जेव्हा अभिनेत्री त्यांच्या करिअरमधील काही ध्येय पूर्ण करुन त्यानंतरच लग्नाचा विचार करत असायच्या. आता तर लग्नानंतरही अनेक अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातात. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं, याचा अर्थ असा नाही की लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हे लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे’, असं सुरवीनने स्पष्ट केलं.
खासगी आयुष्याविषयीसुद्धा सुरवीनने या मुलाखतीदरम्यान काही खुलासे केले. सुरुवातीला आपण लग्नाचा विचार करताना धास्तावल्याचंही तिने स्पष्ट केलं. रिलेशनशिपमध्ये आलेल्या काही अडचणींमुळेच सुरवीनच्या मनात ही भीती होती. पण, अक्षयच्या बाबतीत सर्व गोष्टी लक्षात घेतच ती या निर्णयावर पोहोचली.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

आपल्या पतीसोबतच्या नात्यातील सहजतेविषयी सांगत सुरवीन म्हणाली, ‘मी माझ्या सहकलाकाराला ऑनस्क्रिन किस करु शकते. इतकच काय, तर चित्रपटाची गरज असल्यास न्यूड सीनही देऊ शकते. मी ते सर्व करु शकते, जे कथानकाच्या दृष्टीने गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्यावर माझ्या पतीचा कधीच आक्षेप नसेल. मुळात आम्ही एकमेकांसोबत इतक्या सहजपणे वावरु शकतो याची जाणीव झाल्यानंतरच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या महिलेला आणखी काय हवंय? ज्यावेळी मला एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर येते त्यावेळी अक्षय नेहमीच माझ्या पाठीशी उभा असतो. त्यामुळे आता विवाहित अभिनेत्रींविषयी सर्वांनीच आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे’, असं सुरवीन म्हणाली. सुरवीनच्या या मुलाखतीची सध्या कलाविश्वात बरीच चर्चा सुरु आहे. येत्या काळात मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा आपला कोणताच बेत नसल्याचं तिने या मुलाखतीदरम्यान सांगितलं असून, एका चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आपण असल्याचंही तिने सांगितलं.

First Published on April 17, 2018 12:43 pm

Web Title: bollywood actress surveen chawla speaks about her comfort and personal space with husband