बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्ये चित्रपट करायचा ठरवलाच तर आजची तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली प्रतिमा पाहता ते तिला सहज शक्य आहे. तरीही हॉलीवूडपटात काम न करता प्रियांकाने ‘क्वाँटिको’सारख्या अमेरिकन शोमध्ये काम करणे पसंत केले आहे. केवळ प्रियांकाच नाही तर अनिल कपूर, अनुपम खेर यांसारखे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ज्यांनी मोठय़ा हॉलीवूडपटात काम केले आहे त्यांनीही सध्या चित्रपटांपेक्षा अमेरिकन टीव्ही शोजमध्ये काम करायला पसंती दिली आहे.
हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या इरफान खानने मध्यंतरी हॉलीवूडपटांमध्ये काम करून फार आर्थिक फायदा मिळत नाही, असे म्हटले होते. इरफानच्या मते हॉलीवूड चित्रपटात तुमची भूमिका कितीही लांबीची असो, तुम्हाला त्यांच्या चित्रीकरणाच्या सत्रात पूर्ण सहभागी व्हावे लागते. शिवाय, तिथला राहणीमानाचा खर्चही तितकाच जास्त असल्याने ते फायदेशीर ठरत नाही. त्यामानाने हॉलीवूडच्या शोजना तिथेही तेवढीच प्रेक्षकपसंती आहे आणि इथे भारतातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचाच फायदा उठवत अगदी प्रियांका चोप्रापासून ते टीना देसाई, निम्रत कौरसारख्या तरुण अभिनेत्रींनीही अमेरिकन शोज करण्याला प्राधान्य दिले आहे.
प्रियांका चोप्राने याआधी यूटीव्ही डिस्नेच्या ‘प्लेन’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी आपला आवाज दिला होता. आता ती ‘द क्वाँटिक ो’ या अमेरिकन शोमध्ये एफ बीआय एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण अमेरिकेतच सुरू असल्याने सध्या प्रियांकाची लॉस एंजेलिस ते मुंबई अशा वाऱ्या सुरू राहणार आहेत. ‘२४’ सारख्या हॉलीवूड शोजमध्ये काम केल्यानंतर अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा हॉलीवूडमध्ये परतले आहेत. मात्र, या वेळी कुठल्याही शोमध्ये काम न करता एका अ‍ॅनिमेशन मालिकेसाठी अनिल कपूर आपला आवाज देणार आहेत. ग्रिफिन परिवारावर आधारित या मालिके ला आवाज देण्यासाठी अनिल कपूरला खास आमंत्रण देण्यात आले आहे. हिंदूी चित्रपटसृष्टीतील नव्या कलाकारांमध्ये अभिनेत्री निम्रत कौरने ‘लंचबॉक्स’ या एकाच चित्रपटानंतर ‘होमलँड’सारख्या हॉलीवूड मालिकेत काम करणे पसंत केले आहे.
‘सेकंड बेस्ट एक्झॉटिक हॉटेल’ या हॉलीवूडपटात काम केल्यानंतर अभिनेत्री टीना देसाई आता ‘सेन्स ८’ या अमेरिकन शोमध्ये काम करते आहे. ‘सिल्व्हर लाइनिंग प्लेबुक’सारख्या हॉलीवूडपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे अभिनेता अनुपम खेरही ‘सेन्स ८’ या शोमध्ये दिसणार आहेत. चित्रपटांपेक्षा मालिका निवडायची असा एकच विचार करून ही निवड केली जात नाही, असे अभिनेत्री टीना देसाईने सांगितले.
मात्र, या शोचे दिग्दर्शक हे स्वत: लेखक आहेत. शोजची पटकथाच इतकी दमदार आहे. शिवाय, अमेरिकन शोजचे तंत्रज्ञ-कलाकार हे अत्युच्च दर्जाचे असल्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, असे टीनाने स्पष्ट केले.