IPL 2020 RR vs KKR : कोलकाता आणि राजस्थान या दोन संघांमध्ये बुधवारी IPLचा सामना रंगला. राजस्थानविरूद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७४ धावा केल्या. युवा सलामीवीर शुबमन गिलच्या ४७ धावा आणि इयॉन मॉर्गनने शेवटपर्यंत किल्ला लढवत केलेली नाबाद ३४ धावांची खेळी यांच्या जोरावर कोलकाताने १७०पार मजल मारली. जोफ्रा आर्चरने अतिशय कंजुष गोलंदाजी करत केवळ १८ धावांत सर्वाधिक २ बळी टिपले. पण सामन्यादरम्यान बॉलिवूडचा ‘किंग खान’ खास आकर्षण ठरला.

कोलकाता-राजस्थान सामन्यासाठी शाहरूख खानने हजेरी लावली. स्टेडियममध्ये शाहरूख खान पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घालून बसला होता. त्याने निळ्या रंगाचं हूड घातलं होतं आणि त्याचसोबत निळ्या रंगाचं मास्कदेखील घातलं होतं. त्याच्या या नव्या लूकवर नेटिझन्स फिदा झाल्याचे दिसून झाले. ट्विटरवर शाहरूखबद्दलच्या ट्विट्सचा पाऊस पडला. पाहूया काही निवडक ट्विट-

दरम्यान, शाहरूखच्या कोलकाता संघासाठी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताचा सलामीवीर सुनील नारायण याने चाहत्यांची निराशा केली. १४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १५ धावा करून तो माघारी परतला. नितीश राणाने चांगली सुरूवात केली होती, पण तो १७ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसलही चांगली सुरूवात मिळाल्यावर बाद झाला. ३ षटकारांसह त्याने २४ धावा केल्या. दिनेश कार्तिकही एका धावेवर बाद झाला. पण इयॉन मॉर्गनने मात्र संयमी खेळी आणि मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत कोलकाताला १७०पार पोहोचवले. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावत २३ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या.