बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर जवळपास २७ वर्षांनंतर स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या आगामी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल’ या टॅगलाइनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात वडील, मुलाचं एक वेगळं नातं पाहता येणार आहे. अमिताभ बच्चन यात वडिल्यांच्या भूमिकेत असून, ऋषी कपूर ७५ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत.

आता मुलगाच पंच्याहत्तरीचा असल्यावर वडिलांचं वय किती असेल, याचा अंदाज तुम्हीही लावूच शकता. पण, वयाच्या आकड्याचा अंदाज लावत असतानाच ‘वयोवृद्ध’ हा शब्द जर तुम्ही बिग बी साकारत असणाऱ्या पात्रासाठी वापरणार असाल तर हा ट्रेलर नक्कीच पाहा. कारण, वयाचा वाढता आकडा म्हणजे फक्त एक संकल्पना असून त्याचा आपल्या दिलखुलास जगण्यावर काहीच फरक न पडू देणाऱ्या अफलातून पात्राला बिग बींनी न्याय दिला आहे, याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

वडिलांच्या विक्षीप्त वागण्याचा आपल्याला होणारा मनस्ताप पण, तरीही चेहऱ्यावरुन कोणतीही भावना व्यक्त न करणाऱ्या ‘ओल्ड स्कूल’ मुलाची म्हणजेच ऋषी कपूर यांनी साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘१०२ नॉट आऊट’च्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहता प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने परवणी ठरणार आहे असंच म्हणावं लागेल.

उमेश शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाला असणारी विनोदी झाक आणि या दोन्ही कलाकारांचा दमदार अभिनय ही चित्रपटाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे. वडिल आणि मुलाच्या हटके नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट ४ मे ला प्रदर्शित होणार आहे.