23 November 2017

News Flash

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार ‘या’ खेळाडूची प्रेमकहाणी

मुख्य भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 4:41 PM

संदीप सिंग

मिल्खा सिंग, मेरी कोम, एम.एस. धोनी, सचिन तेंडुलकर या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट साकारल्यानंतर आता यामध्ये आणखी एका खेळाडूचं नाव समाविष्ट झालं आहे. हॉकीविश्वात नावाजलेल्या संदीप सिंग याच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट साकारण्यात येणार असून, अभिनेता दिलजित दोसांज यामध्ये मुख्य भूमिका दिसणार असल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलं आहे.

शाद अली दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे आत्मचरित्रपट नसून, त्यातून संदीपच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या भागांवरच प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. संदीप सिंगच्या प्रेमकहाणीवर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार असून, दिलजित दोसांजसोबतच अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा यात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. दोन हॉकी खेळाडूंची प्रेमकहाणी आणि त्यातून पुढे जाणाऱ्या कथानकाच्या आधारे हा चित्रपट साकारण्यात येणार आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नाहीये. पण, तापसी आणि दिलजित या दोघांनाही त्यांच्या भूमिकांसाठी हॉकीचं प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं कळत आहे. त्यासाठी या खेळातील निष्णांत प्रशिक्षकांची मदतही घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात पंजाबमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचंही म्हटलं जातय. तापसी आणि दिलजित या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळतंय. दिलजितचा एकंदर चाहता वर्ग, तरुणींमध्ये त्याचं वाढतं वेड आणि तापसी पन्नूची वाढती लोकप्रियता, गेल्या काही दिवसांमध्ये तिचे गाजलेले चित्रपट या साऱ्याचा त्यांच्या आगामी चित्रपटाला फायदा होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on September 13, 2017 4:36 pm

Web Title: bollywood movie judwaa 2 actor taapsee pannu to romance punjabi superstar diljit dosanjh in shaad alis upcoming film