बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अवघ्या १८ कोटींच्या निर्मिती खर्चामध्ये साकारलेल्या ‘पॅडमॅन’कडून या चित्रपटाशी संलग्न प्रत्येकाच्या अनेक अपेक्षा आहेत. अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच एक महत्त्वाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचवतोय. ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या चित्रपटातून स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरलेला हा खिलाडी सध्या महिला, मासिक पाळी, त्यादरम्यान महिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणी या मुद्द्यांकडे सर्वांचे लक्ष वेधतोय.

‘पॅडमॅन’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्य़ापासून पुरुषांमध्येही या ट्रेलरचीच चर्चा आहे. सॅनिटरी पॅडच्या विषयावर तेसुद्धा खुलेपणाने बोलत आहेत. या साऱ्याचा मला आनंद होतोय, असे अक्षयने ‘फर्स्टपोस्ट’शी बोलताना स्पष्ट केले. समाजात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर आधारित नसल्याचं ठाम मतही त्याने यावेळी मांडलं. त्याविषयीच माहिती देत तो म्हणाला, ‘सर्वप्रथम तर हा चित्रपट संवेदनशील विषयावर आधारित नाही. मासिक पाळी ही मानवी शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याविषयी असणारे सर्व न्यूनगंड आणि गैरसमज मोडीत काढत परिपक्वतेने हा मुद्दा सर्वांनीच समजून घेतला पाहिजे. अगदी महिलांनीसुद्धा या विषयी कुजबूज न करता खुलेपणाने चर्चा करायला हवी.’

वाचा : ‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

आपणही वयाच्या २० व्या वर्षी या सर्व गोष्टींविषयी जाणून होतो, असेही त्याने या मुलाखतीत सांगितले. ‘मी स्वत: पॅड कधीच हातात घेतला नव्हता. माझ्या घरातूनही मला सॅनिटरी पॅड घेऊन येण्यास कधीच सांगण्यात आले नव्हते. गेल्या दोन वर्षांमध्येच या गोष्टीविषयी मला मोलाची माहिती मिळाली. यातूनच एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, मासिक पाळी आलेल्या महिलांना अशुद्ध समजले जाते आणि त्यांना हीन वागणूक दिली जाते. स्वयंपाक घरात प्रवेश करायचा नाही, लोणच्याच्या बरण्यांना स्पर्श करायचा नाही, मंदिरात जायचे नाही, केस धुवायचे असे विविध निर्बंध त्यांच्यावर लावण्यात येतात. इतकेच नव्हे तर मासिक पाळीच्या वेळी काहीच मार्ग नसल्यामुळे अखेर काही मुलींना शाळाही सोडावी लागली आहे’, असे म्हणत अक्षयने खंत व्यक्त केली.