अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अली अब्बास जफ दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानसोबतच अभिनेत्री कतरिना कैफही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, ज्यात कतरिना आणि सलमान साहसी दृश्ये करताना पाहायल मिळाले होते. चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा शमत नाही तोच या चित्रपटाचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.

एकेकाळी एकमेकांना डेट करणारे सलमान आणि कतरिना या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी स्क्रीन शेअर करत असून, त्यांच्यातील ‘ऑनस्क्रीन केमिस्ट्री’विषयी बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातही ‘टायगर जिंदा है’ मधून त्यांच्यातील समीकरण एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कतरिना आणि सलमान त्यांच्या ‘स्वॅग’ने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’

यातील पहिले गाणे ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण, त्याआधीपासूनच या गाण्यातील काही क्षणचित्रे अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. ‘यशराज फिल्म्स’ आणि ‘टायगर जिंदा है’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये सलमान आणि कतरिनाचे लूकही तितकेच लक्षवेधी असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हा आता या दोन्ही कलाकारांचा ‘स्वॅग’ प्रेक्षकांना भावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.