श्री नारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं तेव्हा या गाण्याने अनेकांचीच मनं जिंकली. ‘हस मत पगली प्यार हो जायेगा’ असं बोल असणाऱ्या या गाण्यातून गायक सोनू निगमने एका वेगळ्या अंदाजात प्रेमाची परिभाषा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या गाण्यामध्ये अक्षय कुमार साकारात असलेल्या केशवची झलक पाहायला मिळाली होती.

त्याच्यामागोमाग आता अभिनेत्री भूमी पेडणेकर साकारत असलेल्या जयाच्या नजरेतून ‘हस मत पगले प्यार हो जायेगा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. मुलच मुलीच्या प्रेमात पडतात या परिस्थितीला हे गाणं अपवाद ठरत आहे. आपल्याशी नजरानजर झालेल्या केशवने आपल्याकडे पाहावं यासाठी जया काय आटापिटा करते, त्याचं प्रेम मिळवण्यासाठी तीसुद्धा कशा प्रकारे शक्कल लढवते हे या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

सिद्धार्थ- गरिमाने लिहिलेल्या या गाण्याच्या फिमेल व्हर्जनला गायिका श्रेया घोषालने आवाज दिला असून बऱ्याच काळानंतर तिचा आवाज पुन्हा एकदा अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. उत्तर भारतातील गावांमध्ये फुलणारी केशव आणि जयाची ही सुरेख प्रेमकथा या गाण्यातून पाहायला मिळत आहे. ‘चष्मे से लेकर टी- शर्ट तक सारे ब्रँड नकली विदेशी है पर आदमी देसी हूं’, या हटके संवादाने या गाण्याची सुरुवात होत आहे. साचेबद्ध अभिनयाला बाजूला सारत पुन्हा एकदा अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाचा सुरेख नमुना या गाण्यात दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. भूमी आणि अक्षयची एकंदर केमिस्ट्रीसुद्धा अनेकांचच मनं जिंकत आहे. तेव्हा आता ही देसी प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.