|| स्वप्निल घंगाळे

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयावर भारतीय हिंदी मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी आनंद, तर पाकिस्तानमधील कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. या अभिनंदन आणि नाराजीदरम्यान आणखीन एक गोष्ट समोर आली ती म्हणजे या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यासंदर्भात सुरू झालेल्या चढाओढीची. कलम ३७० रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून या विषयावर आधारित चित्रपटाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. तसं पाहिलं तर काश्मीर आणि रुपेरी पडद्याचं नातं जुनं आहे..

काश्मीर म्हटल्यावर चित्रपटाच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘हंसी वादिया, बर्फिले पहाड’ यांसारख्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. नुकताच भारत सरकारने काश्मीरबाबत महत्त्वाचा निर्णय घेत कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अद्याप ही प्रक्रिया सुरू असली तरी दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीला कलम ३७० या विषयाचे वेध लागले आहेत. कलम ३७० आणि अशाच काही नावांच्या नोंदणीसाठी आता निर्मात्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

कलम ३७० संदर्भातील चित्रपटांच्या नावांची नोंदणी करताना ‘आर्टिकल ३७०’ तसेच ‘धारा ३७०’ असं नाव देण्यासाठी अनेक निर्मात्यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’कडे धाव घेतली असल्याचे वृत्त आहे. या दोन नावांशिवाय ‘कश्मीर हमारा है!’ या नावालाही प्रचंड मागणी असून या एका नावासाठी तब्बल २० ते ३० निर्मात्यांनी नोंदणी केल्याचे बोलले जाते. यापूर्वी असाच प्रकार पुलवामा हल्ल्यानंतर ‘पुलवामा’ या नावासाठी, तर भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर ‘अभिनंदन’, ‘बालाकोट’ या शीर्षकांसाठी पाहायला मिळाला होता. एकंदरीतच चित्रपट निर्मात्यांत देशभक्तीपर आणि त्यातही काश्मीरचा संबंध असणारे चित्रपट बनविण्यात विशेष रस असतो ही काही नवीन बाब नाही.

देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात असं इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास दिसते. त्यामुळे अचूक कलाकारांची निवड आणि सत्य घटनेची कथेशी योग्य प्रकारे घातलेली सांगड या दोन गोष्टी म्हणजे देशभक्तीपर चित्रपट यशस्वी करण्याची गुरुकिल्ली ठरली आहे. त्याचा प्रत्यय दोनच दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी पाहिल्यावर येतो. सामान्यपणे तिकिटबारीवर दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांना पुरस्कार मिळत नाही असं बोललं जातं. मात्र यंदा हे चित्र वेगळं आहे. अनेक विक्रम मोडणाऱ्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यामुळेच अशा देशभक्तीपर चित्रपट बनवण्यासाठी आणि त्यातही त्याच्या नावासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येते.

याआधीही काश्मीर आणि त्यातही युद्धांवर आधारित सिनेमांनी प्रेक्षकांच्या घरात आणि पुरस्कारांच्या यादीत आपले नाव कोरल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणजे अगदी १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ या १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर आधारित चित्रपटाला मिळालेल्या ‘सेकेण्ड बेस्ट फीचर फिल्म’ या राष्ट्रीय पुरस्कारापासून ते अगदी कालपरवा जाहीर झालेल्या ‘उरी’ या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे युद्धावर आधारित सिनेमांना प्रेक्षकांबरोबरच दिग्गजांकडूनही दाद मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

तसं काश्मीर आणि युद्ध चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास अशोक कुमार आणि नलिनी जयवंत यांची भूमिका असणारा ‘समाधी’ (१९५०), ‘हम दोनो’ (१९६१), भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याची कथा सांगणारा ‘हमसाया’ (१९६८), देव आनंद यांची भूमिका असणारा ‘प्रेम पुजारी’ (१९७०), ‘ललकार’ (१९७२), राजकुमार यांचा १९७३ ला प्रदर्शित झालेला ‘हिंदुस्तान की कसम’ याबरोबरच शशी कपूर यांचा ‘विजेता’ (१९८२), अशोककुमार यांचा ‘आक्रमण’ (१९७५) या जुन्या चित्रपटांची नावे आवर्जून घेता येतील.

१९९७ साली प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा चित्रपट दूरचित्रवाहिन्यांवर लागल्यास आजही आवर्जून पाहिला जातो. याशिवाय ‘टँगो चार्ली’ (२००५), ‘१९७१’ (२००७), ‘मिशन कश्मीर’ (२०००), ‘याहान’ (२००५), ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ (२००४), ‘लम्हा: द अन टोल्ड स्टोरी ऑफ काश्मीर’ (२०१०), ‘फना’ (२००६), ‘हैदर’ (२०१४), ‘एलओसी: कारगिल’ (२००३), ‘लक्ष्य’ (२००४), ‘क्या दिल्ली क्या लाहोर’ (२०१४), ‘अग्निपंख’ (२००४), ‘एक था टायगर’ (२०१२), ‘फॅण्टम’ (२०१५) ‘मौसम’ (२०११)  यांसारख्या चित्रपटांच्या कथा काश्मीरवर आधारित आहेत.

भारत-पाकिस्तान संबंध दाखविणाऱ्या चित्रपटांचेही तसे प्रकार पडतात. अमेरिकन चित्रपटांमध्ये जसं रशियन लोकांनी अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचे दाखवले जाते तसेच भारतीय चित्रपटांमध्येही पाकिस्तानने भारताच्या विरोधात रचलेले कट उधळून लावण्यासंदर्भातील कथानकांची चांगलीच चलती आहे. यामध्ये अगदी सनी देओलच्या ‘हिरो: द अन टोल्ड स्टोरी ऑफ स्पाय’पासून ते ‘राझी’पर्यंतच्या चित्रपटांमध्ये हेच पाहायला मिळते. आलिया भटची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘राझी’ चित्रपटाला मिळालेल्या यशावरून हेरगिरीसंदर्भातील चित्रपटांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते हे सिद्ध झालं. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांवर वेगळ्या अर्थाने भाष्य करणारे चित्रपटही येऊन गेले आहेत. यामध्ये अगदी ‘बजरंगी भाईजान’पासून ‘द गाझी अटॅक’ ते ‘रोझा’ आणि ‘दिल से’पासून ‘दीवार: लेट्स ब्रिंग अवर हिरोज होम’पर्यंत  चित्रपटांचा समावेश आहे.

मुळात जगातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरबद्दल असणारे प्रचंड आकर्षण आणि त्याला दिलेली देशभक्तीची जोड यामुळे ‘काश्मीर’ या विषयावर आधारित जवळजवळ सर्वच चित्रपटांनी तो तो काळ गाजविला. आता कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरसंदर्भातील कोणते विषय चित्रपटसृष्टी कशा प्रकारे हाताळणार हे येणारा काळच सांगू शकेल.