Dilip Thakur article
दिलीप ठाकुर

दिलीप ठाकूर

नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करणारी गाणी हिंदी चित्रपटातून सर्वच काळात पाह्यला मिळतात. पण पूर्वीच्या चित्रपटातील अशा गाण्यात गोडवा व नायकाचा संयम या गोष्टी विशेषत्वाने दिसत. उगचच त्या नायिकेची अवाजवी छेड काढलेली नसे. एक प्रकारे त्या काळातील समाजमनाचे जणू प्रतिबिंब त्या गाण्यात दिसे. असेच हे एक गाणे, ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को…’ नायक राजेन्द्रकुमार नायिका बी . सरोजादेवीला उद्देशून याच गाण्यात पुढे म्हणतो, ‘मुखड़े को छुपा लो आँचल में, कही मेरी नज़र ना लगे चश्म-ए-बद्दूर’

निर्माते एल. व्ही. प्रसाद यांच्या प्रसाद प्रॉडक्शन्स (चैनई. तेव्हाचे मद्रास)च्या ‘ससुराल'(१९६१) मधील हे छान रोमॅन्टिक गाणे आहे . दिग्दर्शक टी. प्रकाश राव यांनी एका छानशा मोठ्या प्रसन्न गार्डनमध्ये हे गाणे सादर करताना खूपच संयमाने हे गाणे साकारलेय. राजेंद्रकुमार बी. सरोजादेवीशी फार लगट न करतानाही तिचे कौतुक करतो व त्यातच थोडीशी छेडही काढतो. हे चैन्नईतील फुले व झाडांनी नटलेले गार्डन आहे हे एका ठिकाणी तमिळ भाषेतील रेखाटन पाहताना लक्षात येते.

यूँ ना अकेले फिरा करो, सबकी नज़र से डरा करो
फूल से ज़्यादा नाज़ुक हो तुम चाल संभल कर चला करो
जुल्फों को गिरा लो गालों पर मौसम की नज़र ना लगे
चश्म-ए-बद्दूर…

छानसे हलकेसे हसत खेळत राजेंद्र कुमार व बी. सरोजादेवी हे गाणे अभिनित करतात. राजेंद्रकुमार त्या काळातील ज्युबिली कुमार. त्याच्या जवळपास सर्वच चित्रपटातील गाणी अशीच सुरेल व गुणगुणायला सोपी म्हणूनच लोकप्रिय. बी. सरोजादेवी दक्षिणेकडील चित्रपटातील नायिका. हिंदीत तिने काही चित्रपटातून भूमिका साकारल्यात. त्यातील हा सुपरहिट. छान लाजत मुरडत ती या गाण्यात वावरलीय.

एक झलक जो पाता है, राही वहीं रुक जाता है
देखके तेरा रूप सलोना, चाँद भी सर को झुकाता है
देखा ना करो तुम आईना कहीं खुद की नज़र ना लगे
चश्म-ए-बद्दूर…

नायिका पर्समधील छोट्या आरशात पहात असतानाच नायक तिला असा प्रेमाचा सल्ला देतो. या गाण्यात तो असे सल्ले बरेच देतो. हसरत जयपुरी यांच्या या गीताला शंकर जयकिशन यांचे संगीत आहे. मोहम्मद रफीच्या अनेक लोकप्रिय गाण्यातील हे एक. यात… चश्मे बद्दूर गाताना त्याने सूरात केलेला छोटासा बदल या गाण्याचे मोठेच आकर्षण ठरलाय.

दिल में चुभें वह तीर हो तुम, चाहत की तकदीर हो तुम
कौन ना होगा तुमसे दीवाना, प्यार भरी तस्वीर हो
निकला ना करो तुम राहों पर जर्रो की नज़र ना लगे
चश्म-ए-बद्दूर…