कोरिओग्राफर- दिग्दर्शक रेमो डिसूझा याने डान्सवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले.‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’नंतर आता त्याचा तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा कपूर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

‘स्ट्रीट डान्स’ या चित्रपटासाठी डान्स करत असताना श्रद्धाचा पाय मुरगळला असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. याचे काही फोटो श्रद्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा यापूर्वीदेखील जखमी झाली आहे. एका डान्सचा सराव करताना तिच्या मानेला आणि खांद्याला दुखापत झाली होती.


विशेष म्हणजे श्रद्धापूर्वी वरुण धवनदेखील या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाला होता. रेमो आणि धर्मेशसोबत भांगडा डान्सचा सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

दरम्यान, ‘स्ट्रीट डान्सर’ हा ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि वरुणव्यतिरिक्त प्रभुदेवा आणि नोरा फतेही हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त श्रद्धा ‘साहो’ या चित्रपटातही झळकणार आहे.