‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’, ‘हाऊसफुल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते बमन इराणी यांची लव्हस्टोरी एखाद्या परिकथेप्रमाणेच आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी बमन इराणी वेफर्सच्या दुकानात काम करायचे. याच दुकानात त्यांना त्यांचं प्रेम मिळालं आणि तिच्यासोबत फर्स्ट डेटला गेल्यावर त्यांनी लगेचच लग्नाची मागणी घातली. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.

झेनोबियाला पाहताच क्षणी बमन त्यांच्या प्रेमात पडले होते. बमन यांच्या वेफर्स शॉपमध्ये त्या वेफर्स घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या दररोज त्या दुकानात जाऊ लागल्या होत्या. त्यांनासुद्धा बमन आवडू लागले होते, हे त्यावरूनच समजलं होतं. “नाहीतर रोज इतके वेफर्स कोण विकत घेतं”, असं ते गमतीशीरपणे म्हणाले. हळूहळू दोघांची ओळख वाढू लागली. एकमेकांशी फोनवर बोलू लागले, भेटू लागले. जेव्बा झेनोबिया यांची बीएससीची परीक्षा होती, तेव्हा तिच्या वडिलांनी बमन यांना तिच्याशी एक महिना न बोलण्यास सांगितलं होतं. झेनोबिया अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीये, असं म्हणत त्यांनी दोघांना एकमेकांपासून लांब राहायला सांगितलं. मात्र या अंतरामुळे दोघांमधील प्रेमाची भावना आणखीनच उत्कट झाली. परीक्षा संपल्या संपल्या बमन व झेनोबिया पहिल्यांदा डेटवर गेले. हॉटेलमध्ये मेनू पाहण्याआधीच बमन यांनी लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे झेनोबिया यांनी त्यावर त्याच क्षणी होकारसुद्धा कळवला.

त्या रात्री मला दोन गोष्टी समजल्या असं बमन म्हणाले. “एक म्हणजे मला झेनोबियाशी लग्न करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आम्हाला घरात टीव्हीची कधीच गरज नसेल. आम्ही दोघंही भरभरून आयुष्य जगण्याच्या वृत्तीचे आहोत. लग्नाबाबतची एक चांगली गोष्ट म्हणजे, झेनोबियाचा रात्री ९ वाजताचा कर्फ्यू संपला. तिचे वडील तिची वाट बघत बसायचे. झेनोबियाने लग्नानंतर वेफर्सचं दुकान आणि घरसुद्धा सांभाळलं. आम्हाला दोन मुलं झाली. तिने माझं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात पूर्ण साथ दिली. आता मी जरी कॅमेरासमोर दिसत असलो तरी माझ्यामागे तिचा खंबीर पाठिंबा आहे. एकमेकांना हसवत, एकमेकांसोबत हसत ३५ वर्षे कधी पूर्ण झाली समजलंच नाही”, असं त्यांनी म्हटलं.