रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला बॉम्बे वेल्वेट या चित्रपटाचा ट्रेलर गुरूवारी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांना थेट १९६०च्या दशकात घेऊन जातो . साठीच्या दशकातील मुंबई शहराचे प्रतिबिंब या ट्रेलरमध्ये उत्तमपणे दिसून येत आहे. उराशी मोठी स्वप्ने बाळगून असलेला मुंबईतील एक स्ट्रीट फायटर आणि अप्रतिम सौंर्दय असलेली जॅझ गायिका यांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित आहे. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर ही परफेक्ट लव्हस्टोरी दीर्घकाळ टिकू शकते की नाही, ही शंका प्रेक्षकांच्या मनाला चाटून जाते. तर दुसरीकडे खलनायकाच्या भूमिकेतील करण जोहरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. करणने या चित्रपटात कैझाद खंबाटा या उद्योगपतीची व्यक्तिरेखा साकारली असून यशस्वी आणि मोठी व्यक्ती होण्याचे स्वप्न असलेल्या जॉनी बलराजला (रणबीर कपूर) पाठिंबा देतो. मात्र, यामागे त्याचा सुप्त हेतू असल्याचा अंदाज हा ट्रेलर पाहताना येतो. याशिवाय, साठच्या दशकात चालणारी सोने तस्करी, गिरणी कामगारांची निदर्शने अशा घटनांचे ओझरते चित्रण या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. अनुराग कश्यपचे दिग्दर्शन असलेला बॉम्बे वेल्वेट प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी चर्चेत आहे.