दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतरही त्यांच्या आठवणी अजूनही कायम आहेत. श्रीदेवी यांनी प्रत्येक चित्रपटामध्ये आपली वेगळी छाप सोडली केली. त्यांच्या याच कार्याची दखल अनेक वेळा घेतली गेली. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. असाच एक सन्मान त्यांच्य़ा निधनानंतरही त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या या मानाच्या पुरस्कारांचा वितरण सोहळा लवकरच होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे पती बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली, खुशी आणि जान्हवी यांच्यासोबत दिल्लीमध्ये पोहोचले आहेत.

३मे रोजी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे २०१७ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना आणि कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी विजेत्या कलाकारांची आणि चित्रपटांची घोषणा केली असून यात श्रीदेवी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्रीदेवी आपल्यात नसल्याने पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचा निर्णय़ घेतल्याचे सांगण्यात येत आहे.